Samudra Setu: भारतीय नौदलाच्या वतीने सोमवारपासून ‘समुद्र सेतू’ मोहिमेचा पुढचा टप्पा

Samudra Setu: The next phase of the Indian Navy's 'Samudra Setu' operation from Monday

एमपीसी न्यूज – परदेशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘समुद्र सेतू’ मोहिमेचा पुढचा टप्पा सोमवार (1 जून) पासून राबविण्यात येणार आहे.

या टप्प्यामध्ये भारतीय नौदलाच्या जलाश्व या जहाजाने श्रीलंकेतल्या कोलंबोमधून 700 भारतीयांना तामिळनाडूतल्या तुतिकोरीन बंदरावर आणण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मालदिवमध्ये अडकलेल्या आणखी 700 भारतीयांना माले बंदरातून आणण्यात येणार आहे.

भारतीय नौदलाने राबविलेल्या ‘समुद्र सेतू’ मोहिमेतून याआधी 1,488 भारतीयांना मायदेशी आणले आहे. त्यांना माले बंदरातून कोची येथे आणण्यात आले होते.

श्रीलंका आणि मालदिव या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी तिथल्या भारतीयांची सूची बनविण्यात येत आहे. यानंतर आवश्यक वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना आपल्या देशात आणण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करणे सर्वांना अनिवार्य करण्यात आले आहे. सागरी प्रवासामध्ये जहाजावर मूलभूत सुविधा आणि वैद्यकीय मदत दिली जाणार आहे.

तुतिकोरीन या बंदरावर उतरल्यानंतरही राज्य सरकारच्या देखरेखीखाली सर्व प्रवाशांची देखभाल केली जाणार आहे. या संपूर्ण मोहिमेची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि भारत सरकार तसेच राज्य सरकारच्या इतर विविध एजन्सी यांच्या सहकार्याने पार पाडण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.