‘सांधण व्हॅली’ निसर्गाचा एक अद्भुत अविष्कार

(देवा घाणेकर)

एमपीसी न्यूज – अद्भुत अनाकलनीय सह्याद्रीची कलाकृती म्हणजे सांधण व्हॅली. वास्तविक पाहता सह्याद्री मंडळ म्हणजे उंच गिरीशिखरे, बुलंदबेलाग कडेकपारी, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, म्हणुन वर्णलेल्या या महाराष्ट्र देशी सांधण व्हॅली ही जरा निसर्गाची हटकेच कलाकृती म्हणावी लागेल.

पुण्यापासून पाच सहा तासांच्या प्रवासानंतर आपण भंडारदरा प्रदेशातील साम्रद ह्या गावी पोहचतो. साम्रदच्या चहूबाजूला अनेक गिरिदुर्ग – शिखरे ह्यांचा विळखा पडलेला आहे. सगळ्यात उंच शैल साम्राज्ञी कळसुबाई तो अवघ्या सह्याद्रीचा माथा. उंची पाच हजार तीनशे चाळीस फुट. डावीकडे नजर फिरवली मदन-अलंग-कुलंग हिमालयात तपस्वी साधू बसल्याप्रमाणे शांत बसलेला जो कसलेल्या गिर्यारोहकांचा ड्रिम ट्रेक. तशीच नजर पुढ केली की आजोबा, सीतेचा पाळणा, तेथून तशीच नजर फ़िरवली की नवरा-नवरीचे सुळके, पुढे गेलो की सह्याद्रीतले अनमोल रतन किल्ले रतनगड व त्याचा खुट्टा, शिपनुर अशा नजरेच्या एका फ़ेकीत सापडले तितके हे सह्याद्रीतले माणिक मोती. एक एक शिखर जर बारकाईने पाहिले तर फार पुराणाशी ह्या शिखरांचा संबध. सारी सह्याद्री ह्या शिखरांनी अजेय करून ठेवलेली.

साम्रदपासून १५ मिनिटांच्या चालीने वाट मुख्य घळीत उतरते. सुरवातच एका चिंचोळ्या वाटेने होते. आत डोकावून पाहाल तर दगड धोंड्याची अजिबात कमी जाणवत नाही. समोर 100-150 फ़ुटांची उंच दरड उभी ठाकलेली आहे. त्या मधून चिंचोळ्या आकाराची घळई आरपार गेली आहे. हळू हळु घळीने खाली खाली सरकायचे. कित्येक सपाट्या पावसाळी ओहोळ ह्या वाटेने खाली उतरतात. त्यात वर्षानुवर्षाच्या वाहनान दोन्ही बाजुवा अगदी ढिसाळ केलेल्या. दोन्ही बाजूच्या मोठमोठ्या धोंडी अक्षरश कलथून मध्ये आणुन टाकलेल्या. ह्या दगडावर कसरतीने चढायचे आणि प्रयत्नपूर्वक दुसऱ्या बाजूने उतरायचे असा खेळ सारा मांडावा लागतो. अंदाजे १०-१५ मिनिटे चालल्यावर एक पाण्याचा डोह लागतो. सरसकट कमरेपर्यंत भिजवाल्याशिवाय तुम्हाला पलिकडे जाता येत नाही. बर्फासारख्या थंड पाण्यात उतरून पाठीवरची ओझी सहिलसलामत पैलतीरी न्यावी लागतात. ‘एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ’ ह्या उक्ती प्रमाणे काम करून एक एक बॅग पाण्याच्या पलिकडे नेताना या बॅगा कुणाच्या व्यवस्थित तर कुणाच्या थोड्या भिजतात. ह्या साऱ्या प्रकारात तासाभराची वेळ निघून जाते.

दगडांशी लपंडाव चालू होतो. कातळात आरपार घुसत गेलीली घळई हे अद्भुत प्रकरण. ऊन पहायलाही कुठे दिसत नाही, दोन्ही बाजूची उंच भिताडे सुर्यकिरणांना थोपवून धरतात. महाराष्ट्राचे लाडके कवी गोविंदाग्रजानी महाराष्ट्राला दगडांच्या देशा म्हणून संबोधले आहे. दगडांच्या देशा म्हणजे वज्रालाही अभेद्य. दगड हा काय प्रकार आहे तो सांधण व्हॅली पुरेपूर अनुभव देतो. ह्या धोडंयावरुन त्या धोंड्यावर जायचे अशा साऱ्या गंमतबाज रस्त्यान जमेल तसे अंतर कापायचे.

पायाखाली दगड, पुढचे पाउल दगडावर, डाव्या बाजूला दगड, उजव्या बाजूला दगड, समोर दगड, मागे दगड……… फक्त दगड दगड दगड. दगडांशी रग्गड मैत्री बनते. जस जसे अंतर कापतो तसतसे दगडांचा साईज मोठमोठा होतो. काही अंतराने बहुप्रतीक्षेत असणारा ५०-६० फुटांच्या रॉकपॅच जवळ पोहचतो. इथे तुमच्यासोबत गिर्यारोहणातील प्रशिक्षित लीडर असावा. प्रशिक्षित लीडर्स आवश्यक त्या साधनांसह एकेकाला रॅपलिंगचा थरार अनुभवत सुरक्षित खाली उतरवतात. पहिल्यांदाच रॅपलिंग करणारे ह्या क्षणांचा पुरेपूर आनंद घेतात. आणि साऱ्या आठवणी पुढे कित्येक दिवस मित्र- मैत्रिणींना कौतुकाने सांगतात.

संपूर्ण चालीत उन्हाचा लवलेश नसतो. दोन्ही बाजूचे उत्तुंग कडे मध्ये बारीक चिंचोळी घळ रॉक पॅच सोडल्यानंतर रुंद होत जाते. तसा दगडांचा साईजही मोठा होतो. दगडांची तर गणतीच नव्हती. सोबत सांधण व्हॅलीचा स्पेशल दगड म्हणुन घरी नेवून संग्रहात भर टाकवी असा मोह होतो पण ह्या मोठाल्या दगडावरची चढाई उतराई, त्यात बॅग खचाखच भरलेल्या, पाय आधीच जड त्यात ह्यांची भर कशाला ?. मजल दरमजल करत साडेचारच्या सुमारास बेस कॅम्पजवळ पोहचतो.

बेसकॅम्प जवळच असणाऱ्या पाण्याच्या कुंडात मनसोक्त पोहून घ्यायचे. थंड निळाशार पाण्यात पोहण्याची मजा काही औरच. त्यातच आशा कडेकपाऱ्यांच्या सानिध्यात तीन बाजूला उंच कडे समोर त्या कड्यावरुन घळघळणारे पाणी त्यातआपण पोहतायेत ते ही सह्याद्रीच्या कुशीत सारेच अविस्मरणीय. त्यानंतर रात्रीच्या जेवणावर तुटून पडायचे. शेकोटी भवती घेर करून गप्पा आणि गाण्याची सुरेल मैफिल जमवायची आणि आजच्या दिवसाची उजळणी करीत तंबूमध्ये निवांत पडायचे.

पक्षांच्या किलबिलाटाने जाग येते. चहा – नाश्ता झाल्यावर सांधण व्हॅलीचा निरोप घेऊन कऱ्होली घाटाने परतीचा प्रवास सुरु होतो. वाट तशी अवघड नाही पण सरळ वर चढलेली. भोवताल टेकड्यानी दाटलेले. रस्त्याच्या दुतर्फा झाडांनी सावली धरलेली. अधून मधूनच कुठे उन्हाचा स्पर्श होत होता. दक्षिणेला लांब दिसणारा आजोबा, त्याच्या बाजूला सीतेचा पाळणा, लव-कुश क्षणभर मनात ठेवून पुढे नवरा नवरी सुळके ह्या साऱ्याना पाठीशी ठेवत साम्रदच्या पठारावर येवून पुन्हा रतनगड आणि त्याच्या खुट्याने दर्शन दिल्यावर मन सुखावते.

एव्हाना पोटात हत्तींची मॅरॅथॉन रेस सुरु झालेली असते. जेवणाच्या पंगतीत ‘साम्रद फ़ेमस’ ठेच्यानी होते. व्हेज – नॉनव्हेज जेवणाचा फडशा उडाल्यावर साम्रद गावाला निरोप देऊन परतीचे वेध लागतात. वाटेत मिळणारे रतनवाडीतील अमृतेश्वराचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागलो.

दोन दिवसात सांधण व्हॅली हा काय प्रकार आहे तो याची देही याची डोळा पाहून होतो. पाण्याच्या डोहाजवळ केलेली साखळी व त्याचे हाड गोठवणारे ते थंड पाणी, दगडावरच्या माकड उड्या, आयुष्यात प्रथम केलेली रॅपलिंग, बेस कॅंपला मनसोक्त पोहणे, सह्याद्रीच्या साक्षीने टिपूर चांदण्यात तंबूमध्ये घेतलेली निवांत झोप, अमकु, कळसुबाई, रतनगड ह्यांच्या साक्षीने घाटघर धरणात पोहणे, कोकणकड्याची रौद्रभीषणता अनुभवणे. परतीच्या प्रवासात अंताक्षरीत रंगलेली जुगलबंदी सारे सारेच अविस्मरणीय.

नवे मित्र-मैत्रिणी, नव्या ओळखी, व्हर्टिकल एम्स ह्या पुण्यातील संस्थेतील अनुभवी आणि प्रशिक्षित लीडर्सने केलेले योग्य आणि काटेकोर नियोजन. “लाईफ़ मे बहुत कुछ पहिली बार होता है लेकिन आखिरी नही” ह्याची प्रचिती येते. …. एक वेगळाच ट्रेक ….एक भन्नाट अनुभव.
ह्याच संस्थेच्या माध्यमातून येत्या 21-22 डिसेंबरला ह्या ट्रेकचे पुन्हा नियोजन केले आहे. संपर्कासाठी  7066081213 ह्या नंबरवर संपर्क साधू शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.