Sangavi Crime News : धक्कादायक! निवृत्त एसीपी असल्याचे सांगून शिक्षिकेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – पैशाची अडचण असलेल्या शिक्षिकेला दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून, घरी बोलावले व बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान, या आरोपीने आपण निवृत्त एसीपी असल्याचे सांगून शिक्षिकेचे अक्षेपार्ह फोटो काढून तिला व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपळे गुरव येथे डिसेंबर 2019 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत ही घटना घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि.10) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास अवस्ती (रा. डायनासोर गार्डन जवळ, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला शिक्षिका म्हणून नोकरी करते. पैशांची अडचण निर्माण झाल्याने त्यांनी आरोपी विकास अवस्ती याच्याकडे पैशांची मागणी केली.

दरमहा दहा टक्के व्याजाने पैसे देतो, असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेकडून दोन कोऱ्या धनादेशांवर व कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर फिर्यादीला शितपेय देऊन जबरस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच अक्षेपार्ह फोटो काढून घेतले व फिर्यादीला पैसे दिले नाहीत.

तसेच आरोपी फिर्यादी यांच्या कामाच्या ठिकाणी गेला. ‘तू जर नाही आली, तर हे फोटो स्कूलमध्ये व तुझ्या घरच्यांना दाखवून तुझी बदनामी करतो,’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीला दुचाकीवरून बसवून घेऊन गेला.

तसेच ‘तू जर ओरडलीस, कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, मी निवृत्त एसीपी आहे. माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही,’ अशी धमकी देऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.