Sangavi : पथनाट्याद्वरे कोरोनाविषयी जनजागृती

एमपीसी न्यूज –  ‘कोरोना’ या विषाणुजन्य आजाराने खळबळ माजवली आहे. प्रत्यक्ष प्रादुर्भावापेक्षाही अफवा, अपप्रचारामुळे भीतीची भावना बळावली आहे. या पार्श्वभूमीवर दिलासा संस्थेने ‘कोरोना इसे मत डरोना! असे पथनाट्य साजरे करत उलटसुलट चर्चा यांवर नाट्यमय पद्धतीने ऊहापोह करून ‘भीती बाळगू नका असे आवाहन केले.

सांगवी गावातील मजूरअड्डा चौक येथे पथनाट्य सादर केले. वैज्ञानिक परिभाषा, किचकट संज्ञा यांचा भडिमार न करता सर्वसामान्य माणसाला समजेल, उमजेल अशा घरगुती आणि सार्वजनिक प्रसंगातील संवादातून नेहमीचे सर्दी-पडसे आणि कोरोनाची लक्षणे, दक्षता आणि प्रतिबंधक उपाययोजना याची माहिती देण्यात आली.

उलटसुलट चर्चा यांवर नाट्यमय पद्धतीने ऊहापोह करून ‘भीती बाळगू नका!’ , ‘अफवा पसरवू नका! ‘ , ‘तोंडाला मास्क लावा’ , ‘शरीराची स्वच्छता ठेवा’ हे संदेश अधोरेखित केले. कोरोनाविषयी प्रबोधन करणारे फलक, टोपी-सदरा यावरील लिखित आकर्षक घोषणा आणि ध्वनिक्षेपकाचा वापर यामुळे अन्य नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी प्रबोधनपर घोषणा दिल्या.

पथनाट्यामध्ये वयाची चाळिशी ओलांडलेल्या विजया नागटिळक (अल्लड शाळकरी मुलगी), मधुश्री ओव्हाळ (आई), नंदकुमार कांबळे (सरपंच), सुभाष चव्हाण (उच्चशिक्षित नागरिक), शामराव सरकाळे, सुरेश कंक, मुरलीधर दळवी, अरुण परदेशी (सर्वसामान्य नागरिक), संगीता झिंजुरके, मीरा कंक, शरद शेजवळ, प्रदीप गांधलीकर (सामाजिक कार्यकर्ते) आणि निशिकांत गुमास्ते (डॉक्टर) अशा भूमिका वठवून शंकाचे निरसन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.