Sangavi : तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरावर गुन्हा

एमपीसी न्यूज – प्रियकर तरुणीवर वारंवार पाळत ठेवून तसेच तिला फोन करून त्रास देत असे. त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ‘त्या’ प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी तरुणीच्या 57 वर्षीय आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सूर्यकांत पुष्पेंद्र रावल (रा. जबलपूर, मध्य प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत 26 वर्षीय तरुणी 2015 मध्ये मगरपट्टा येथील एका कंपनीत नोकरीस लागली. दरम्यान ती तिच्या मोठ्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिचे आरोपीशी प्रेमसंबंध जुळले होते. परंतु आरोपी तिला वारंवार त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून काही महिन्यातच तिने नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर देखील आरोपी तिच्यावर पाळत ठेवत असे. तसेच ‘तू खराब कॅरेक्टरची आहेस, तुझे आणखी काही जाणांबरोबर प्रेम संबंध आहेत. मी तुला बदनाम करेन’ अशी धमकी आरोपी वारंवार तरुणीला देत असे.

  • त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने 30 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास राहत्या फ्लॅटच्या हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 31 डिसेंबर 2018 रोजी सकाळी दहाच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तरुणीच्या आईने गुन्हा नोंदवला असून सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भुजबळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.