Sangavi: राजकीय पक्षाच्या ‘राष्ट्रीय’ सरचिटणीसाची पोलिसांशी हुज्जत!(व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा नागरिकांना संसर्ग होऊ नये, सर्वांनी घरातच रहावे, यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन काम करणा-या पोलिसांशी एका पक्षाच्या युवक संघटनेच्या ‘राष्ट्रीय’ सरचिटणीसाने हुज्जत घातली. त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली. यामुळे संताप व्यक्त केला जात असून हा प्रकार सांगवी येथे नुकताच घडला आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संचारबंदी, लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. परंतु, असे असतानाही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील मागे नाहीत. सांगवी परिसरात रात्री घराबाहेर पडलेल्या एका पक्षाच्या युवक संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणासाने हुज्जत घातली.

पोलिसांनी गाडी थांबविण्याचे सांगूनही निघून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी गाडी थांबविली. त्यानंतर हे राष्ट्रीय सरचिटणीस गाडीतून खाली उतरले. ‘मी कोण आहे, तुम्हाला माहित पण नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने ट्रीट करत आहात’ असे म्हणत पोलिसांशी हुज्जत घालू लागले.

त्यामुळे पोलिसांनी देखील आपल्या ‘खाक्या’ दाखविला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्यानुसार तेल लावून ठेवलेल्या काठीचा देखील पोलिसांनी वापर केला. त्यामुळे हे राष्ट्रीय सरचिटणीस जागेवर आले. एकीकडे राजकीय लोकप्रतिनींधीकडून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले जाते. तर, दुसरीकडे काही राजकीय पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारीच पोलिसांशी अशाप्रकारे हुज्जत घालत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

घरी राहून आराम की हॉस्पिटलमध्ये बेड… आपले आरोग्य आपल्या हाती….नियमांचे पालन करा, वरचढपणाने वागू नका….घरी रहा सुरक्षित रहा…..असे मॅसेज फिरवून लोकांना घरी राहण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे स्वत: मात्र नियमांचे पालन करायचे नाही. त्यामुळे नागरिकांना सांगण्याअगोदर स्वत: नियमांचे काटेकोर पालन केल्यास नागरिकांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो, याचे भानही राष्ट्रीय सरचिटणीसांना राहिले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.