Sangavi news: महापौर उषा ढोरे यांनी घेतली कोरोनाची लस

शहरवासीयांना लस घेण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांनी आज (शुक्रवारी) कोरोनाची लस घेतली. सांगवी येथील लसीकरण केंद्रावर कोव्हिशिल्ड (सिरम कंपनी ) लस महापौरांनी टोचून घेतली. लस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन महापौरांनी शहरवासीयांना केले.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना प्राधान्याने लस दिल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस टोचण्यात येत आहे.

शहरातील नागरिकांचा कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कालपर्यंत 51 हजार 870 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

महापौर ढोरे यांनी आज सांगवीतील लसीकरण केंद्रावर लसीचा पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी आपले नाव लसी करणासाठी नोंदवावे. लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले.

अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, महापौर कार्यालयातील कर्मचारी निर्मला शिंदे यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.