Sangavi News: महापौरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रश्नसंच वाटप

मुलांची प्रगती तपासण्यासाठी प्रश्नसंचची होणार मदत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते प्रश्नसंच वाटप करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांकडे अ‍ॅंड्रॉइड मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी या प्रश्नसंचाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रश्नसंचाचे वाटप सांगवीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा क्र. 49 येथे सुरक्षित अंतर ठेवत महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनाच्या परिस्थितीत महापालिका शाळेतील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र महापालिकेच्या सर्वच विद्यार्थ्यांकडे अ‍ॅंड्रॉइड मोबाईल नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिकलेला अभ्यास समजण्यासाठी प्रश्नसंचची निर्मिती करण्यात आली. हे प्रश्नसंच सांगवीच्या महापालिकेच्या शिक्षकांनी तयार केले. या प्रश्नसंच छपाईसाठी आकुर्डीच्या जानकीदेवी ग्रामविकास संस्था यांनी सहाय्य केले. यावेळी वर्गशिक्षकांना हे प्रश्नसंच सोपवण्यात आले. शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना हे देण्यात येणार आहे. कोरोनामुळे खबरदारी घेत सुरक्षित अंतर ठेवत हा कार्यक्रम पार पडला.

महापालिकेच्या शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्नसंच शाळेच्या वतीने शिक्षकांनी तयार केले आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत शिकलेल्या अभ्यासाचा अंतर्भाव केलेला आहे. यामुळे घरात थांबूनच विद्यार्थ्यांना प्रश्नसंच सोडवता येणार आहे. हे प्रश्नसंच शिक्षकांमार्फत जमा केले जातील. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून शिक्षकांनाही येत्या काळात कशी अभ्यासपद्धती अवलंबता येईल हे ठरवणे सोपे जाईल. महापौरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.