Sangavi News: सांगवी-बोपोडीदरम्यान मुळा नदीवर पालिका नवीन पूल उभारणार; 32 कोटी 36 लाखांचा खर्च  

स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सांगवी-बोपोडीदरम्यान मुळा नदी पात्रावर नवीन पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 32 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. मे. टी अँण्ड टी इन्फ्रा लिमिटेड यांना काम देण्यास स्थायी समिती सभेत आज (बुधवारी) आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. या पुलामुळे सांगवी परिसरातून बोपोडी, पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स, औंध रस्ता व खडकीच्या दिशेने ये-जा करणे सोईचे होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचे काम रखडले होते. बोपोडीतील स्मशानभूमीच्या बाजूने होणार्‍या पुलामुळे तेथील अनेक घरे बाधित होणार असल्याने पुलास विरोध झाला. त्या जागेत बदल करून, आता सांगवीतील ममतानगर येथील दत्त आश्रम मठापासून पुणे विद्यापीठामागील चंद्रमणी नगरच्या शेजारच्या कृषी महाविद्यालयाच्या जागेत हा 760 मीटर लांबीचा दोनपदरी पूल उभारण्यात येणार आहे.

सांगवी-बोपोडीदरम्यान मुळा नदीवर नवीन पूल उभारण्यासाठी महापालिकेने 40 कोटी 26 लाख 30 हजार 738 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यात मे. टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड, मे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, मे. मनोजा क्रिन्शाई जेव्ही, मे. इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. रक्षित इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, मे. मेहेर फाऊंडेशन अँड सिव्हील इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, मे. व्ही. एम. मातेरे इन्फ्रा प्रायव्हटे लिमिटेड, मे. शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या नऊ ठेकेदारांनी निविदा भरल्या.

त्यामध्ये मे. टी. अँड टी. इन्फ्रा लिमिटेड यांची लघुत्तम दराची निविदा प्राप्त झाली. त्यांनी  30 कोटी 99 लाख रुपयांचा दर दिला. महापालिका प्रशासनाने टी. अँड टी. यांना आणखी दर कमी करण्याबाबत 5 जुलै 21 रोजी पत्राद्वारे विचारणा केली. त्यावर 6 जुलैला आहे त्या दरावर कायम असल्याबाबत ठेकेदाराने महापालिकेला कळविले. टेस्टींग चार्जेस, आरसीसी डिझाईन चार्जेस, सिमेंट, स्टील फरक व रॉयल्टी चार्जेसह कामाची किंमत लमसम 42 कोटी 74 लाख 35 हजार इतकी येत आहे. त्यात जीएसटीचा समावेश नाही.

टी. अँड टी. यांनी दिलेला 30 कोटी 99 लाख रुपयांचा दर निविदा स्वीकृतयोग्य 42 कोटी 74 लाख रुपयांशी तुलना करता 24.30 टक्के कमी आहे. ही निविदा बीक्यूक्यू रकमेवर 23.03 टक्के कमी आल्याने निविदा रकमेवर 22.06 टक्के म्हणजेच 9 कोटी 7 हजार रुपयांची परफॉरमन्स अनामत रक्कम (पीएसडी) एस बँकेची बँक गॅरंटी घेतली आहे.

रॉयल्टी, मटेरियल टेस्टींग चार्जेससह 32 कोटी 35 लाख 58 हजार 33 रुपयांमध्ये टी. अँड टी. यांच्याकडून काम करुन घेण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

या भागातील वाहतूक होणार सुलभ

या पुलाची रूंदी 18.60 मीटर आहे. सांगवीच्या बाजूने 80 मीटर आणि पुण्याकडील बाजूस 555 मीटरचा पोहचरस्ता आहे. पुलावर पदपथ असणार आहे. पुलासाठी एकूण 6 पिलर आहेत. या पुलामुळे बोपोडी, पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स, खडकी, औंध रस्ता या दिशेला ये-जा करणे. पुण्यातून सांगवी, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरवला जाणे सुलभ होणार आहे. स्पायसर महाविद्यालय रस्त्यावर असलेला सध्याचा मुळा नदीवरील पूल एक पदरी असून दोन्हीकडील जोडमार्ग अरूंद आहेत. त्यामुळे वर्दळीच्या वेळी वाहतूक कोंडी होते. त्या पुलास हा नवा पूल पर्यायी ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.