Sangavi News: भाजी विक्रेत्यांवरील ‘अतिक्रमण’ची कारवाई अन्यायकारक – अतुल शितोळे

हॉकर्स झोनची कार्यवाही तातडीने करा

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सांगवीतील स्थानिक भाजी विक्रेत्यांच्या भाज्याच्या हातगाड्या, वजन काटे जप्त केले जातात. ते साहित्य पुन्हा मिळविण्यासाठी एक ते दोन हजार रुपये दंड वसूल केला जात आहे. ही अन्यायकारक कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांनी केली. तसेच कोरोना परिस्थितीचा विचार करता या विक्रेत्यांचा रोजगार जाऊ नये यासाठी त्यांना परवाना देण्यासाठी तातडीने थोरण आणण्याची मागणीही त्यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहेत. त्यात शितोळे यांनी म्हटले आहे की, सांगवी परिसरात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर भाजी विक्री करतात. या व्यवसायातून मिळणा-या उत्पन्नातून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात.

कोरोना परिस्थितीती कमी होत असल्याने भाजी विक्रेते पुन्हा आपला व्यवसाय करु लागले असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्यांच्या भाज्याच्या हातगाड्या, वजन काटे जप्त केले जातात. ते साहित्य पुन्हा मिळविण्यासाठी एक ते दोन हजार रुपये दंड वसूल केला जातो. ही कारवाई अन्यायकारक आहे.

कोरोना महामारीच्या संकटामुळे हे विक्रेते हैराण झाले आहेत. सरकार नोकरी, व्यवसाय करण्यासाठी मदत करत नाहीत. त्याचबरोबर अशा व्यावसायिकांसाठी महापालिका स्थापन होऊन 35 वर्षे उलटून गेले तरी हॉकर्स झोन निर्माण करता आले नाहीत. ही प्रशासनाची चूक नाही का, महापालिकेने हे धोरण न राबविल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर भाजी विक्री करतात.

महापालिकेने मानवतेच्या दृष्टीकोन म्हणून भाजी विक्रेत्यांना व्यवसायला मनाई करु नये. त्यांच्याकडून पालिकेने भुईभाडे आकारुन शुल्क घ्यावे. त्यामुळे पालिकेला उत्पन्न मिळेल आणि भाजी विक्रेत्यांचा देखील रोजगार सुरु राहिल. तसेच सांगवी गावातील आठवडे बाजार हा फक्त राजकीय स्टंट असून संबंधित लोकप्रतिनीधी याचा फायदा घेतात.

बाजारात शेतकरी नव्हे तर मोठे भाजी विक्रेते याचा फायदा घेतात. मात्र, स्थानिक भाजी विक्रेते यामुळे बेरोजगार होतात. 23 वर्षांपूर्वी सांगवीत भाजी मंडई केली आहे. त्यावेळी 200 ते 250 भाजी विक्रेते होते. गाळ्यांची संख्या 78 होती. गाळे वाटपात अडचणी आल्या, त्याचे नियोजन फसले आहे. सध्याच्या परिस्थितीत भाजी विक्रेत्यांची संख्या सुमारे 450 पर्यंत गेली आहे, असेही शितोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.