Sangavi: पवनाथडी जत्रेला आजपासून सुरुवात ; आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते जत्रेचे उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने  महापालिकेतर्फे भरविण्यात येणा-या चार दिवसीय पवनाथडी जत्रेला आजपासून सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते जत्रेचे उद्‌घाटन करण्यात आले. 

सागंवीतील पी.डब्लू.डी. मैदान येथे 4 ते 8 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या जत्रेच्या उद्‌घाटन प्रसंगी महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे,  शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘ब’ प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, ‘क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, ‘ग’ प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक संतोष कांबळे, हर्षल ढोरे, विलास मडिगेरी, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसेविका शारदा सोनवणे, उषा ढोरे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, आशा राऊत, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, कार्यकारी अभियंता केशव फुटाणे, सहाय्यक समाजविकास अधिकारी सुहास बहादरपुरे आदी उपस्थित होते.

शहरातील महिला बचत गटांना पाठबळ देणे हे पवनाथडी जत्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी बचत गटांनी आपल्या व्यवसायासाठी मार्केटिंग करणे गरजेचे असल्याचे सांगत आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ”महापालिकेमधील पदाधिकारी व अधिका-यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करावेत. गेली अनेक वर्षे पवनाथडीचे आयोजन करून देखील महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात यश आले नाही. पवनाथडी जत्रेचा उद्देश साध्य होत नसल्यास पुढील वर्षी पवनाथडी जत्रेचे आयोजन करावे कि नाही याबाबत विचार करावा लागेल”.

अंजली भागवत म्हणाल्या, ”पवनाथडी म्हणजे उद्योजक महिलांचे ऑलिम्पिक असल्यासारखेच आहे. पवनाथडीच्या माध्यमातून महिला उद्योजकांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. महिला उद्योजकांनी व्यवसायामध्ये आत्माविश्वासाने पुढे जावे”. ”शहरातील कला-कौशल्य असलेल्या महिलांना हक्काची बाजारपेठ देण्यासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. पवनाथडी जत्रेमुळे अनेक महिला बचत गटांना चालना मिळाली व स्वतंत्र अशी ओळख मिळाली. शहरातील नागरिकांनी आपल्या शहरातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठीपवनाथडी जत्रेला भेट द्यावी”, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.

जत्रेत  शाकाहारी खाद्यपदार्थांचे 247 आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे 205 स्टॉल्स असणार आहेत. तर, वस्तू विक्रीचे 361 स्टॉल असे एकूण 813  स्टॉल्स आहेत.

जत्रेत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल!

आज (शुक्रवार )सायंकाळी पाच वाजता म्युजिक मेलेडी हिंदी मराठी नृत्यगीतांचा कार्यक्रम तर सायंकाळी सात .वाजता ‘गर्जा हा महाराष्ट्र’ हा कार्यक्रम होणार आहे. शनिवार (दि. 5) सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम व सायंकाळी सात  वाजता ‘लावण्य दरबार’ हा लावण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

रविवार (दि. 6)सायंकाळी पाच वाजता लिटील चॅम्स, सारेगमप कलाकार यांचा व सायंकाळी सात  वाजता ‘बॉलीवूड स्टार्स’ , हिंदी जुनी गीते, कव्वाली व गजल हा कार्यक्रम सादर होणार आहे. सोमवारी (दि.7) सायंकाळी पाच वाजता  धडाकेबाज सखी हा महिलांसाठी खास पैठणीचा कार्यक्रम व सायंकाळी सात वाजता गायन,वादन व नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. मंगळवार (दि. 8) सायंकाळी पाच  वाजता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ( I Love My India ) तर सायंकाळी सात वाजता  कलाअविष्कार, मराठी चित्रपट गीते, भावगीते या कार्यक्रमाने पवनाथडी जत्रेची सांगता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like