Pimpri: संगीतमार्तंड पं. जसराज यांचे पिंपरी चिंचवडशी होते सांगितिक ऋणानुबंध

Sangeet Martand Pt. Jasraj had a musical bond with Pimpri Chinchwad.

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ शास्त्रीय गायक संगीतमार्तंड पं. जसराज यांचे वृद्धापकाळाने अमेरिकेतील न्यूजर्सी येथे निधन झाले. आपल्या दमदार आणि अभ्यासपूर्ण गायकीने रसिकांच्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करणा-या पं. जसराज यांचे पिंपरी चिंचवडशी वेगळे नाते होते. पिंपरी चिंचवडमध्ये होणा-या स्वरसागर महोत्सवात त्यांना 14 वा स्वरसागर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

त्यावेळी बोलताना जसराजजी म्हणाले होते की, ‘कोणताही पुरस्कार कलाकाराला विशिष्ट उंचीपर्यंत नेतो. त्यामुळे प्रत्येक पुरस्कार हा महत्वपूर्ण असतो. तो कलाकाराच्या आयुष्यात वेगळीच छाप पाडतो’.

त्यावेळी हा महोत्सव पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येत असे. हा 18 वा संगीत महोत्सव होता. त्यावेळी सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता.

संभाजीनगर येथील साई उद्यानात हा कार्यक्रम रसिकांचा अलोट गर्दीत झाला होता. नव्या आणि जुन्या पिढीच्या रसिकांचा सुंदर समन्वय त्यावेळी दिसून आला होता.

त्यावेळी पंडितजींनी पिंपरी चिंचवडमधील विविध सुविधा, येथील रस्ते यांचे खूप कौतुक केले होते. असे रस्ते मुंबईत का नाहीत ? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला होता.

हे शहर अतिसुंदर आहे असे शहरवासियांना अभिमान वाटेल असे कौतुक देखील केले होते. तसेच त्याआधी दहा वर्षांपूर्वी त्यांच्या हस्ते विदुषी प्रभा अत्रे यांना स्वरसागर पुरस्कार देण्यात आला असल्याची आठवण सुद्धा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

त्यानंतर रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गायनदेखील सादर केले होते. पं. जसराज यांनी त्यावेळी राग ‘पूरिया’ सादर  केला होता. ‘फूलन के हरवा’ ही विलंबित लयीतील बंदिश सादर करताना त्यांच्या दमदार गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

त्याही वयातील त्यांची स्वरांवरील पकड, स्वरलगाव, सादरीकरण रसिकांना भारावून टाकणारे होते.

त्यानंतर त्यांनी श्रीकृष्णाची आळवणी करणारे ‘ब्रजे वसंत नवनीत चौरं, गोपांगनांचं गोकुलचौरं’ हे संस्कृत भजन आणि रसिकांच्या खास फर्माइशीनंतर त्यांचेच सुप्रसिद्ध असे ‘ओम नमो भगवते वासुदेवायं’ ही दोन भजने सादर करुन वातावरण भक्तीमय केले.

त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मधुरा आणि कन्या दुर्गा जसराज यादेखील उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.