Sangli News : अध्यात्म आणि भौतिकता यांचे संचित म्हणजे गदिमा – डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज – अध्यात्म आणि भौतिकता यांचे संचित म्हणजे गदिमा होय. सर्व राजकीय प्रवाहांना गदिमांच्या कवितेने एकत्र केले होते. ‘शारदेचा राजा’ असा त्यांचा गौरव कुसुमाग्रज यांनी केला होता. म्हणून गदिमा कवितामहोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महोत्सव आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

ग.दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या 28 व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि गदिमा प्रतिष्ठान-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.17) माडगुळे, जिल्हा सांगली येथे हा महोत्सव पार पडला.

महोत्सवाचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांचे हस्ते झाले. स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, आटपाडी शाखाध्यक्ष अमरसिंह देशमुख, सांगोला शाखाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, सासवड शाखा कार्याध्यक्ष विजय कोलते, माडगुळेचे सरपंच संजय विभूते, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी अध्यक्ष मुरलीधर साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठचे कुलपती डॉ. पी.डी.पाटील (जन्मशताब्दी सन्मान), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि रसिकाग्रणी उल्हास पवार (जीवनगौरव सन्मान) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (मृत्युंजय साहित्य पुरस्कार), लोककलावंत वैशाली काळे, नगरकर (लोककला पुरस्कार), प्रगतिशील शेतकरी पांडुरंग लाडे (कृषिभूषण पुरस्कार), वैजिनाथ घोंगडे (माणगंगाभूषण पुरस्कार) आदींना
यावेळी गौरविण्यात आले. तसेच, आटपाडी एज्युकेशन सोसायटी, ग.दि माडगूळकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज – माडगुळे आणि नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज – नाझरा या संस्थांना ‘गदिमा संस्कारक्षम शाळा सन्मान’ने गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील साहेबराव ठाणगे (नवी मुंबई) लिखित ‘पाऊसपाणी’, विनायक पवार (पेण) लिखित ‘नामुष्कीचे पिढीजात वर्तमान’, देवा झिंजाड (पारनेर) लिखित ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे!’ आणि श्रीनिवास मस्के (नांदेड) लिखित ‘गावभुईचं गोंदण’ या कवितासंग्रहांना गदिमा साहित्यसन्मान प्रदान करण्यात आले.

महोत्सवात गदिमांच्या लेखनाचे आवडते ठिकाण ‘बामणाचा पत्रा’ येथून कार्यक्रमस्थळा पर्यंत पालखीसह साहित्यदिंडी काढण्यात आली. वृक्षपूजनाने आणि गदिमांची पणती पलोमा माडगूळकर हीच्या गदिमागीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले.

उद्घाटक श्रीनिवास पाटील यांनी खास ग्रामीण शैलीत गदिमांची अनेक वैशिष्ट्ये सांगून सोहळ्यामध्ये हास्याचे कारंजे फुलवले. उल्हास पवार म्हणाले, ‘वेदमंत्रांहुनी आम्हा वंद्य वंदेमातरम्’ लिहिणारे गदिमा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाचे प्रतीक होते. समाज अभिसरणाचे सुंदर दर्शन अण्णांच्या रूपाने पंचवटीत वावरत होते’ असे उद्धृत करीत त्यांनी गदिमांच्या हृद्य आठवणी जागवल्या.

डॉ. पी.डी पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गदिमांचे संपूर्ण जीवन हा सर्जनाचा महोत्सव होता, असे भावपूर्ण उद्गार आपल्या मनोगतातून प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले.

‘आम्ही गदिमांचे वारसदार’ या निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण पुरी, अरुण पवार, शिवाजी बंडगर, सुधीर इनामदार, डॉ. अनिल काळबांडे, वर्षा बालगोपाल, निशिकांत गुमास्ते, मदन देगावकर, डॉ. संजीवनी केसकर- पिंगळे आणि रवी कांबळे यांनी सहभाग घेतला.

कविसंमेलनाचे अध्यक्ष उद्धव कानडे यांनी आपल्या मनोगतातून, ‘शब्दकोशापेक्षा हृदयकोशातील शब्दांचे योजन हे गदिमांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे, असे मत त्यांनी मांडले.

कविसंमेलनाचे सूत्रसंचालन भरत दौंडकर यांनी केले. तर, सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले आणि प्रा. विजय शिंदे यांनी केले. सुरेश कंक, बाजीराव सातपुते, काशिनाथ नखाते, सादिक खाटिक, मुकुंद आवटे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे शाखाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी आभार मानले.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.