Indori : सोशल मीडियावरील पोस्टमध्ये स्वतःच्या अंत्यविधीची वेळ टाकून सांगुर्डीच्या तरुणाने केली आत्महत्या; प्रेमभंगामुळे नैराश्य?

एमपीसी न्यूज – आत्महत्या करीत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकून सांगुर्डी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने इंदोरी (ता. मावळ) येथील ब्रिटिशकालीन पुलावरुन इंद्रायणी नदीमध्ये उडी मारून आज (रविवारी) सकाळी आत्महत्या केली. प्रेमभंगातून नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

समीर एकनाथ भसे (वय २३ रा. सांगुर्डी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारास शोध पथकाला त्याचा मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले.

समीरने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडिया वर मी आत्महत्या करत आहे अशा अशयाचे पत्र अपलोड केले. त्यात म्हटले आहे, ‘मी समीर एकनाथ भसे. मी आत्महत्या करीत आहे. यास कोणीही जबाबदार नाही. मी माझ्या मर्जीने व स्वेच्छेने जीवन संपवत आहे. कृपा करून माझ्या मरणाला कोणासही जबाबदार धरु नये. मला जीवन संपवण्यासाठी कोणीही प्रवृत्त केलेले नाही. मी स्वत: हा निर्णय घेतला आहे. नाना- मम्मी मला माफ करा, मी तुम्हाला सोडून चाललोय.’

समीरने MH14 EX 4944 ही दुचाकी इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावर लावली. दुचाकीवर देखील आत्महत्या करीत असल्याचे पत्र ठेऊन त्यावर दगड ठेवला व सकाळी दहाच्या सुमारास इंद्रायणी नदीमध्ये उडी मारली. स्थानिक मच्छीमारांनी समीरला वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही.

समीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकलेल्या विविध पोस्टवरून, त्याला प्रेमभंगामुळे नैराश्य आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या करण्याच्या 10 मिनीट अगोदर सोशल मीडिया वर वाढदिवस केक , गिफ्ट्स, चेहरे लपवलेले तरुण-तरुणी यांचा फोटो अपलोड करुन समीरने जीवन संपवले.

इंस्टाग्रामवरील पोस्ट खाली त्याने “माझा अंत्यविधी सायंकाळी 6 वाजता होणार आहे” असे धक्कादायक वाक्य टाकले. समीर हा सांगुर्डी, इंदोरी परिसरात प्रसिद्ध असून प्रसन्न, प्रेमळ व शांत व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख होती.

समीरने सकाळी १० वाजता इंद्रायणी नदीमध्ये उडी मारल्यानंतर सुसाइड नोट मिळाल्यामुळे एनडीआरएफ टीमने बचाव कार्य करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. एनडीआरएफच्या नियमांनुसार आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला बोलावता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले.

एनडीआरएफने असमर्थता व्यक्त केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काटेरी वनस्पती व दोरखंडाच्या सहाय्याने बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु त्यांना यश आले नाही. ग्रामस्थ व मुलाचे नातेवाईक यांचा रोष वाढत असल्यामुळे एनडीआरएफ टीम, शिवदुर्ग टीम लोणावळा, पीएमआरडीए फायर टीम आदी दुपारी साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी पोहोचल्या. अथक परिश्रमानंतर 5 वाजता शिवदुर्ग टीमला मृतदेह शोधण्यात यश आले. शोधकार्यात अजय शेलार, केदार देवळे, अनिल सुतार, रुपेश गराडे, भास्कर माळी, बाळासाहेब कडू, शेखर गराडे, समीर गराडे, प्रीतम गराडे, आनंद गावडे सहभागी झाले होते.

पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शन खाली तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.