Sangvi : बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; दोन पिस्तूलासह तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि एक गावठी कट्टा त्यासोबतच तीन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार सहाशे रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई खंडणी दरोडाविरोधी पथकाने सांगवी येथे केली.

ओंकार किसन शिंगोरे (वय 19, रा. काटे पुरम चौक, पिंपळे गुरव) आणि गणेश हनुमंता मोटे (वय 20, रा. नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे एक पथक सांगवी परिसरात अँटी चेन स्नॅचिंग पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस नाईक शैलेश सुर्वे आणि आशिष बोटके यांना माहिती मिळाली की, पोलिस रेकॉर्डवरील आरोपी ओमकार शिंगोरे व गणेश मोटे हे दुचाकीवरून पिंपळे गुरव भागात फिरत आहेत. तसेच त्यांच्या जवळ पिस्तूल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना पिंपळे गुरव येथील शेवटच्या बस स्टॉपवरून ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि एक गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार सहाशे रुपयांचा ऐवज मिळाला. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला. तसेच दोघांवर सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि मुंबई पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी पोलिस रेकॉर्डवरील आहेत. दोघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

  • ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, गणेश हजारे, शैलेश सूर्वे, अशिष बोटके, किरण काटकर, उमेश पुलगम, शरीफ मुलाणी, सागर शेडगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.