Sangvi : पिंपळे निलख येथे केबल व्यावसायिकासह दोघांना विनाकारण बेदम मारहाण 

Sangvi: Cable operator had been beaten at Pimple Nilakh for no reason

एमपीसी न्यूज – केबल चालक आणि त्याचा मित्र यांना नऊ जणांच्या टोळक्‍याने विनाकारण बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 28) दुपारी एक वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.
शशिकांत किसन पोशेरे (वय 29, रा. गणेशनगर, पिंपळे निलख) असे जखमी केबल चालकाचे नाव असून त्यांनी गुरुवारी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश भागवत शेळके (वय 26, रा. राजीव गांधी नगर, पर्वती पायथा, पुणे), अनंत कोळी, भूषण कांबळे, पिल्ले व त्याचे पाच साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशिकांत हे केबलचा व्यवसाय करतात. शशिकांत आणि त्यांचा मित्र अनिल भोळे हे दोघेजण गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिंपळे निलख गावठाण येथे केबल चेक करीत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी फिर्यादी शशिकांत यांना हाक मारून बोलविले.
काहीही कारण नसताना आरोपी आकाश शेळके याने फिर्यादी यांच्या थोबाडीत मारली. याबाबत शशिकांत यांनी विचारणा केली असता आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचा मित्र यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच दगडाने डोक्‍यात मारून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.