Sangvi : महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याशी हुज्जत घालून रस्त्याचे काम बंद पाडल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्ता विकसनाचे काम सुरू असताना महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासोबत हुज्जत घालून रस्त्याचे काम बंद पाडले. यावरून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 29) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता विजय चंद्रकांत कांबळे (वय 45) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रभावती सुदाम जाधव (वय 63), शीला अशोक आंबेकर (वय 65), मीना पांडुरंग दळवी (वय 45), अंजुम रशीद शेख (वय 40), पांडुरंग बाबुराव दळवी (वय 53), अभय अशोक आंबेकर (वय 28), अक्षय पांडुरंग दळवी (वय 23, सर्व रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथे पगारे हॉस्पिटल समोर सार्वजनिक रस्त्याचे काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आरोपी कामाच्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हुज्जत घातली आणि रस्त्याचे काम बंद पाडले. त्याबाबत फिर्यादी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत असताना आरोपींनी ‘तुम्ही कसे काम करता तेच बघतो’ अशी धमकी दिली. यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सांगवी पोलोस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.