Sangvi Crime : मुंबईतून पुण्याला पाहुण्यांकडे येणारी महिला सोनाराच्या दुकानात करायची चोऱ्या

एमपीसी न्यूज – पुण्यात राहणा-या पाहुण्यांकडे मुंबईतून येणारी महिला पिंपरी-चिंचवड परिसरातील सोनाराच्या दुकानात जाऊन चोऱ्या करायची. ती महिला ग्राहक म्हणून दुकानात जाऊन दुकानदाराची नजर चुकवून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने अलगद चोरून न्यायची. सांगवी पोलिसांनी महिलेचा माग काढून तिला अटक केली.

विद्या गंगाधर थोरात (वय 49, रा. निळेमोरे गाव, नालासोपारा मुंबई. मूळ रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरात सोनाराच्या दुकानात ग्राहक म्हणून जाऊन सोन्याची चमकी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानदाराची नजर चुकवून दुकानातून सोन्याच्या चमक्या चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासात महिलेचा माग काढला.

संशयित महिला एका कारमधून जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कार चालकाचा शोध लाऊन त्याला ताब्यात घेतले. कार चालकाने सांगितले कि, ती महिला मुंबई येथील आहे. ती आमच्याकडून गाडी भाड्याने घेऊन तिच्या पुण्यातील नातेवाईकांच्या घरी आली होती. ती पुन्हा येणार असल्याचेही कार चालकाने सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी महिलेच्या येण्याच्या मार्गावर सापळा लावला. महिला एका रिक्षातून आली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला तिने पोलिसांना गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या चौकशी समोर ती टिकली नाही. तिने सांगवी आणि चिंचवड परिसरात अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी तिच्याकडून 120 ग्राम वजनाचे सहा लाखांचे सोने जप्त केले. या कारवाईमुळे सांगवी पोलीस ठाण्यातील तीन आणि चिंचवड पोलीस ठाण्यातील तीन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बो-हाडे, अरुण नरळे, विजय मोरे, शशिकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, शिमोन चांदेकर, नीलम गायकवाड, शंकर चिंचकर यांनी केली.

सीसीटीव्हीची नजर चुकविण्यासाठी चोरट्या महिलेचा फंडा
दुकानातून दुकानदाराची नजर चुकवून चोरलेले दागिने घेऊन जाताना चोर महिला सीसीटीव्हीच्या नजरेतून देखील वाचण्याचा काटेकोर प्रयत्न करत होती. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, तसेच प्रमुख रस्त्यावरून न जाता चोर महिला गल्ली बोळातून ये-जा करत होती. त्यामुळे पोलिसांना देखील महिलेचा माग काढणे जिकरीचे झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.