Sangvi Crime : सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सांगवी आणि देहूरोड परिसरात प्रत्येकी एक तर चाकणमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत रविवारी (दि. 18) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात धुराजी अर्जुन गायकवाड (वय 24, रा. देहूगाव, विठ्ठलवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मामा सुभाष बाबुराव रोकडे (वय 38, रा. म्हाळुंगे, बालेवाडी) यांचा एका कारच्या धडकेत पिंपळे निलख कडून बाणेरकडे जाणा-या रोडवर टकले चौकाजवळ झालेल्या कारच्या अपघातात मृत्यू झाला आहे. कार (एम एच 12 / आर झेड 0034) चालक लक्षमण राजेंद्र नलवडे (वय 26, रा. बाणेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रमोद मुरलीधर थिटे (वय 52, रा. म्हाळसकरवाडी, तळेगाव स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे मेहुणे मंदार शेंडे यांच्या दुचाकीला एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेंडे यांचा मृत्यू झाला. धडक देणारा दुचाकीस्वार अजय नरोत्तम हरसुरा (रा. कांदिवली, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्यात बाळू अर्जुन घुले (वय 35, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. पंकज छोटेलाल यादव (वय 23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री नऊ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे रस्ता ओलांडत असताना पंकज यादव याला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता वाहन चालक तिथून निघून गेला.

दुस-या गुन्ह्यात कैलास दगडू पटाईत (वय 26, रा. जोपाईवाडी वठारवस्ती महाळुंगे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता महाळुंगे येथे इंडूरंस चौकातून एच पी चौकाकडे जाणा-या रस्त्यावरून फिर्यादी कैलास यांचे वडील दगडू गोविंदराव पटाईत (वय 60) कामावरून पायी चालत घरी जात होते. त्यावेळी त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.