Sangvi crime News : तरुणाला धमकावत कोयत्याने वार करणाऱ्या गुंडाला अटक

एमपीसी न्यूज – तरुणाला धमकावत त्याच्यावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी (दि. 27) रात्री दहा वाजता जुनी सांगवी येथे ही घटना घडली.

जोग्या उर्फ अक्षय जाधव (रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भूषण दिगंबर हांडे (वय 21, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हांडे बुधवारी रात्री जुनी सांगवी येथील त्यांच्या घराबाहेर बसले होते. त्यावेळी तिथे आरोपी जोग्या आला. त्याने हांडे यांना ‘तू इथून उठ, इथे बसू नको’ असे म्हटले. त्यामुळे हांडे तिथून उठून जाऊ लागले. त्यावेळी जोग्या याने दुचाकीवरून येऊन हांडे यांच्या पाठीवर कोयत्याने वार केले. त्यात हांडे जखमी झाले.

याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी जोग्याला अटक केली. दरम्यान, डिसेंबर 2019 मध्येही त्याला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली होती. तो दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी, शस्त्र बाळगणे असे सात तर चतुशृंगी पोलीस ठाण्यात मारामारीचा एक असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.