Sangvi Crime News : परदेशी तरुणीला नोकरीच्या बहाण्याने भारतात बोलावून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले

0

एमपीसी न्यूज – परदेशी तरुणीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने भारतात बोलावून घेतले. तरुणी भारतात आल्यानंतर तिचा पासपोर्ट हिसकावून घेत तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. याबाबत एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 जानेवारी 2020 ते 10 ऑक्टोबर 2020 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला.

याबाबत पीडित तरुणीने 10 जून 2021 रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्राॅल्सी (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) या महिलेच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 370, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडा येथील रहिवासी असलेली सध्या भारतात वास्तव्य करणारी आरोपी महिला प्राॅल्सी हिने फिर्यादी पीडित तरुणीला कॉल सेंटरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने भारतात बोलावले.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार पीडित तरुणी तिच्या देशातून 25 जानेवारी 2020 रोजी मुंबई विमानतळावर आली. तिथे आरोपी प्राॅल्सी हिने एका व्यक्तीला फिर्यादी यांना घेण्यासाठी पाठवले होते. त्या व्यक्तीसोबत फिर्यादी नवी सांगवी येथे आल्या. नवी सांगवी येथे आल्यानंतर प्राॅल्सी हिने फिर्यादी यांचा पासपोर्ट काढून घेतला.

‘तुला मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल; अन्यथा मी तुझा पासपोर्ट तुला परत देणार नाही’, अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादी या प्राॅल्सी हिच्यासोबत काम करण्यास तयार झाल्या. आरोपी प्राॅल्सी हिने फिर्यादी तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार 10 जून 2021 रोजी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment