Sangvi Crime News : वाहन चालकांना अडवून वाहनांवर कोयत्याने वार करणाऱ्या दोघांची पोलिसांनी काढली धिंड (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केल्यानंतर दोघांनी रस्त्यावर धिंगाणा घातला. भर रस्त्यावर वाहनांना अडवून वाहनांवर कोयत्याने वार करणाऱ्या दोघांना सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची घटनास्थळी धिंड काढली.

प्रतीक संतोष खरात आणि चेतन जावळे (दोघेही रा. पिंपळे निलख) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

जितेंद्र छोटीलाल ठाकूर (वय 23, रा. टकले चौक, पिंपळे निलख, मूळ रा. झारखंड) हे टकले चौक पिंपळे निलख येथे त्यांच्या रूममध्ये जेवण बनवत होते. त्यांच्या साईटच्या शेजारील नदीपात्रालगत नेहमी दारू पिण्यासाठी येणारे आरोपी प्रतीक आणि चेतन हे शनिवारी रात्री जितेंद्र यांच्या रूममध्ये आले.

पाणी पिण्याच्या निमित्ताने आलेल्या आरोपींनी जितेंद्र यांच्याकडे पैसे मागितले. जितेंद्र यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून प्रतिक खरात याने कमरेला लपवलेला कोयता काढून जितेंद्र यांच्या डोक्यावर वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सैराट झालेले हे आरोपी पिंपळे निलख येथील रस्त्यावर आले. रात्री नऊ वाजताच्या सुमारास रस्त्यावरील दुचाकी व चारचाकी वाहने अडविण्यास सुरवात केली. हातातील कोयत्याने दिसेल त्या वाहनावर ते वार करू लागले. जी वाहने समोर येत होती त्या वाहनांवर आरोपी कोयत्याने वार करीत होते. या घटनेचा व्हिडिओ जवळच असलेल्या एका नागरिकाने काढल्यावर तो व्हायरल झाला.

मात्र, एकाही नागरिक किंवा वाहन चालकाने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले नाही. तसेच घटनेची तक्रार देण्यासाठीही कुणी पुढे आले नाही. खूनी हल्ल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात आणखी कलम वाढ केल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिली.

आरोपींना अटक केल्यानंतर सांगवी पोलिसांनी त्यांची घटनास्थळी नेऊन धिंड काढली. आरोपींची धिंड काढून पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला. याबाबत ‘आम्ही आरोपींना घेऊन घटनास्थळ पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कुणीतरी व्हिडीओ तयार केला आहे,’ असे सांगवी पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.