Sangvi : स्कॉर्पिओची काच फोडल्यावरून भांडण; परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – स्कॉर्पिओ गाडीची काच फोडली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर दोन टोळक्यांमध्ये भांडण झाले. एकमेकांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण करण्यात आली. यामध्ये काहीजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश नगर, पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन लक्ष्मण धोत्रे (वय 32, रा. धोत्रे चाळ, गणेश नगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहित जाधव, विशाल जाधव, जनार्दन जाधव, योगेश बनपट्टे, रुपेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांच्या स्कॉर्पिओ कार (एम एच 12 / जी आर 7558) ची आरोपींनी काच फोडली. त्याबाबत सचिन आणि त्यांचे मित्र निलेश मंगळवेढेकर आरोपींकडे विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळेची आरोपींनी बेकायदा जमाव जमवून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात विशाल विजय जाधव (वय 22, रा. भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार निलेश शंकर मंगळवेढेकर (वय 22), सतीश लक्ष्मण धोत्रे (वय 30), सोमनाथ मच्छिंद्र धोत्रे (वय 40), सुरज लक्ष्मण धोत्रे (वय 25), राहुल अनिल धोत्रे (वय 21), शंकर मच्छिंद्र धोत्रे (वय 32, सर्व रा. धोत्रे चाळ, गणेशनगर, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींनी बेकायदा जमाव जमवला. आरोपी सुरज धोत्रे याच्या कारची काच फोडल्याबाबत तो फिर्यादी यांच्याशी बोलत होता. त्यावेळी अन्य आरोपींनी फिर्यादी यांचे मित्र रोहित जाधव, रुपेश सोनकडे यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांचे मित्र गंभीर जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.