Sangvi Crime News : घरफोड्या करणाऱ्या चौघांना सांगवी पोलिसांकडून बेड्या; नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – घरफोडी करणा-या चार आरोपींना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 लाख एक हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात फिर्यादी यानेच घरफोडी केल्याचे उघडकीस आले.

विकी बाजीराव पाटील (वय 20, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी), तोहेब फय्याज खान (वय 29), विशाल बाळू माने (वय 32, दोघे रा. खडकी), योगेश उर्फ घा-या संजय यादव (वय 28, रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात विकी पाटील याने फिर्याद दिली होती.

त्या घरफोडीमध्ये घरातून अडीच लाख रुपये किमतीचे 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

त्या गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी विकी पाटील हाच चोर असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याच्याकडे उलट तपासणी केली असता त्यानेचा हा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून अडीच लाखांचे दागिने, 50 रुपयांचा स्क्रू ड्रायव्हर जप्त केला आहे.

त्यानंतर 27 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्यात सांगवी पोलिसांनी तोहेब, विशाल आणि योगेश या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख 51 हजार 870 रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कार असा एकूण 6 लाख 51 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय भोसले, उपनिरीक्षक यशवंत साळुंखे, कर्मचारी चंद्रकांत भिसे, चिंचकर, कैलास केंगले, सुरेश भोजने, रोहिदास बो-हाडे, अरुण नराळे, विजय मोरे, प्रवीण पाटील, शशिकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, हेमंत कुमार गुत्तीकोंडा, दीपक पिसे, शिमोन चांदेकर, नूतन कोंडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.