Sangvi Crime News : कराटे प्रशिक्षकाला कापून टाकण्याची धमकी; नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथे लिनियर गार्डन येथे कराटेचा सराव करताना थांबलेल्या दोघांना तिथून हाकलून देण्यात आले. त्या रागातून त्या दोघांनी आपल्या साथीदारांना बोलावून कराटे प्रशिक्षकाला शिवीगाळ करून गार्डनच्या बाहेर आल्यावर कापून टाकीन अशी धमकी दिली. तसेचा एका मुलीला दगड मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 2) रात्री घडली.

दीपाली नागेश डोणे (वय 31) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवराम केशव फुलारे (वय 21, रा. रहाटणी चौक), संतोष फुलारे (रा. पिंपळ सौदागर), अभिषेक अनिल चव्हाण (वय 20, रा. रहाटणी) आणि त्यांचे पाच ते सहा अनोळखी मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शिवराम आणि अभिषेक या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी दीपाली आणि त्यांचे कराटे क्लासमधील मित्र लिनिअर गार्डनमध्ये प्रॅक्टिस करीत होते. त्यावेळी तिथे थांबलेल्या आरोपी शिवराम आणि संतोष यांना फिर्यादी यांनी प्रॅक्टिस करत असलेल्या ठिकाणाहून हाकलून दिले.

त्या रागातून शिवराम आणि संतोष यांनी त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांचे कराटे कोच जहीर अन्सारी यांना शिवीगाळ करत गेटच्या बाहेर आले कि कापून टाकीन अशी धमकी दिली. माधुरी स्वामी (वय 17) हिला दगड मारून जखमी केले. तसेच सागर जोशी याला हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी शिवराम आणि संतोष या दोघांना अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.