Sangvi Crime News : दोन श्वानांच्या संशयित मृत्यू प्रकरणी अज्ञातावर गुन्हा

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरात दोन श्वानांचा संशयित मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी (दि. 3) रात्री उघडकीस आला असून याबाबत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद राजन मुरार (वय 50, रा. पिंपळे गुरव) यांनी सोमवारी (दि. 4) रात्री उशिरा सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद मुरार यांच्या पाळीव श्वानाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांच्या श्वानाच्या तोंडाला फेस आला होता. त्यामुळे अज्ञात इसमाने विषारी पदार्थ खायला दिला व त्यामुळेच श्वानाचा मृत्यू झाला असे मुरार यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच, पवना नदी परिसरात एका पोत्यामध्ये आणखी एक मृत श्वान अर्धवट भाजलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. या दोन्ही मृत श्वानांना शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविण्यात आले आहे. दोन्ही श्वानांवर विषप्रयोग केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले म्हणाले, “याप्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर श्वानांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.