Sangvi Crime News : एका गिफ्टसाठी महिलेची 14 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – वाढदिवसासाठी विदेशातून पाठवलेले गिफ्ट दिल्ली येथे कस्टम विभागात अडकले आहे. तिथे पैसे पाठवून गिफ्ट सोडवून घेण्याचे एका व्यक्तीने महिलेला सांगितले.

हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मराठी शादी डॉट कॉम या ऑनलाईन विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झालेला व्यक्ती होता. त्यामुळे  महिलेने मागचा पुढचा विचार न करता तब्बल 14 लाख 9 हजार 208 रुपये वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरले. एवढे पैसे देऊन देखील महिलेला गिफ्ट मिळाले नाही. याबाबत महिलेने सहा महिन्यानंतर फिर्याद दिली आहे.

संजय कुलभूषण जाधव असे नाव धारण केलेल्या व्यक्तीच्या (रा. चिंचवडगाव. मूळ रा. डी. पी. रोड, रामबाग, कांदिवली, पवई मुंबई) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने रविवारी (दि. 12) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 22 मार्च 2021 रोजी ऑनलाईन घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची आणि फिर्यादी महिलेची मराठी शादी डॉट कॉम यावर ओळख झाली. आरोपीने त्याचे फोटो आणि बायोडाटा पाठवून फिर्यादी सोबत लग्न करण्याची इच्छा असल्याचे  सांगितले. 29 एप्रिल 2021 रोजी फिर्यादीचा वाढदिवस असल्याने आरोपीने 22 मार्च 2021 रोजी फिर्यादी यांना गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. तसेच ते दिल्ली येथे कस्टम विभागात अडकले आहे. तिथे काही पैसे पाठवून ते सोडवावे लागेल, अशी थाप आरोपीने मारली.

त्यानंतर आरोपीच्या सांगण्यावरून अमर सिंग या इसमाच्या बँक खात्यावर फिर्यादी यांनी अडतीस हजार रुपये पाठवले. त्यानंतर विविध कारणे सांगून आरोपीने फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. या प्रकारात आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 14 लाख 9 हजार 208 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर पाठवण्यास सांगितले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी याबाबत पोलिसात धाव घेतली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.