Sangvi Crime News : सिलेंडरमधील गॅस चोरून काळा बाजार करणाऱ्या 22 जणांवर कारवाई

; 24 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – सांगवी आणि चिंचवड परिसरात सुरु असलेला घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने उघड केला आहे. तब्बल 22 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 381 गॅस सिलेंडरसह 24 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सांगवी आणि चिंचवड परिसरात भारत गॅस कंपनीची भैरवनाथ गॅस एजन्सी आणि एचपी गॅस कंपनीची कांकरिया गॅस एजन्सी मधील कर्मचारी एका गोडाऊनमधून दुस-या गोडाऊनमध्ये सिलेंडर नेऊन तिथे भरलेल्या सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरतो व गॅस काढून भरलेल्या टाक्या चढ्या दराने बाजारात विकत आहेत, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

त्यानुसार चार पथके तयार करून सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी पहाटेपासून चार ठिकाणी कारवाई केली

पहिल्या पथकाने मोरया पार्क, पिंपळे गुरव, सांगवी या ठिकाणी एकूण 165 गॅस सिलेंडर टाक्या, सात तीन चाकी ॲपे टेम्पो, गॅस रिफिलिंग करण्याचे साहित्य, 11 मोबाईल फोन असा एकूण 12लाख एक हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यामध्ये शंकरपाल अर्जुनराम चौधरी (वय 28, रा. ममता नगर, जुनी सांगवी) व इतर नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुसऱ्या पथकाने जांभूळकर पार्क, सांगवी येथे कारवाई करून 119 गॅस सिलेंडर टाक्या,चार तीन चाकी ॲपे टेम्पो, गॅस रिफीलींग करण्याचे साहित्य, रोख रक्कम, पाच मोबाईल असा एकूण सात लाख 24 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये होतमसिंग यशपालसिंग ठाकूर (वय 23, रा. जांभूळकर पार्क, पिंपळे गुरव, सांगवी) आणि अन्य पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तिसऱ्या पथकाने कृष्णराज कॉलनी, मोरया पार्क, सांगवी येथे कारवाई केली. यात 63 गॅस सिलेंडर टाक्या, दोन तीन चाकी ॲपे टेम्पो, गॅस रिफीलींग करण्याचे साहित्य, रोख रक्कम, चार मोबाईल असा तीन लाख 38 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सुनीलकुमार भगवान बिश्नोई (वय 30, रा. भावनगर, पिंपळे गुरव) आणि इतर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चौथ्या पथकाने गांगुर्डेगनर,पिंपळे गुरव येथे कारवाई केली. यात 34 गॅस सिलेंडर टाक्या, एक तीन चाकी ॲपे टेम्पो, गॅस रिफीलींग करण्याचे साहित्य, दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख 75 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

प्रमोद राजवीर ठाकूर (वय 42, रा. गांगुर्डेनगर, नवी सांगवी) आणि अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

चार ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये एकूण 381 गॅस सिलेंडर टाक्या, गॅस रिफिलिंग करण्याचे साहित्य, रोख रक्कम, 14 तीन चाकी ॲपे टेम्पो, 22 मोबाईल फोन असा एकूण 24 लाख 49 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतले आहे.

प्रत्येक गॅस सिलेंडरमधून एक ते दोन किलो गॅस काढून घेतला जात होता. त्यानंतर काढून घेतलेला गॅस टाक्यांमध्ये भरून पुन्हा त्याची चढ्या दराने विक्री केली जात होती. हे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.