Sangvi Crime News : जेवणाच्या कारणावरून हॉटेल व्यावसायिकावर खुनी हल्ला; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ग्राहकांनी हॉटेल मालकासोबत वाद घातला. त्यानंतर ग्राहकांनी त्यांच्या साथीदारांना आणून हॉटेल व्यावसायिक तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री पिंपळे निलख येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अमोल धुमाळ, अंबादास पासलकर, अक्षय राक्षे, अभि मोरे, राजू फडतरे व त्यांच्या सात ते आठ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अमोल, अक्षय आणि अभि या तिघांना अटक केली आहे.

अक्षय अशोक चव्हाण (वय 25, रा. बाणेर) असे खूनी हल्ला झालेल्या हॉटेल व्यावसायिक तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांचे बाणेर रोड, पिंपळे निलख येथे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास आरोपी अमोल हा फिर्यादी चव्हाण यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता.

त्यावेळी फिर्यादी चव्हाण आणि आरोपी यांची जेवणाच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी अमोल तिथून निघून गेला.

काही वेळेनंतर अमोल त्याच्या अन्य साथीदारांना घेऊन आला. सर्व आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने व दगडाने मारहाण केली.

आरोपी अंबादास याने ‘माझ्या पोरांना जेवण देत नाही का? तुला एवढा माज आला आहे का? तुला माहीत नाही का मी इथला भाई आहे. तुला आता संपवतोच’ असे म्हणून कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार केले. त्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.