Sangvi crime News : वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी मुलाने केली मावशीच्या घरी चोरी; स्वतःच दिली पोलिसात फिर्याद

एमपीसी न्यूज – वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यात त्यांच्यावर कर्ज असल्याने वडिलांना मदत करण्यासाठी मुलाने थेट मावशीच्या घरी चोरी करण्याचे धाडस केले. मावशीच्या घरी चोरी करून त्याने घरफोडी झाल्याचा बनाव रचला. एवढेच नव्हे तर त्याने स्वतः पोलिसात फिर्याद देखील दिली. मात्र, पोलिसांच्या चौकशीत तो ‘उघडा’ पडला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

विकी बाजीराव पाटील (वय 20, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात विकी पाटील याने फिर्याद दिली होती.

त्या घरोफोडीमध्ये घरातून अडीच लाख रुपये किमतीचे 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सहा हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण दोन लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. तसेच आजूबाजूला खब-यांमार्फत चौकशी देखील केली. मात्र, ठोस पुरावा हाती लागत नव्हता. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये फिर्यादी विकी हा नवीन कपडे घालून जाताना आढळला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आणि पोलिसांनी त्याची उलट तपासणी करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या चौकशीपुढे तो फार काळ टिकू शकला नाही. त्यानेच ही घरफोडी केल्याचे कबूल केले.

विकीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तो जुनी सांगवी येथे मावशीच्या घरी राहत होता. मावशीच्या घरात देवघराच्या खाली सोन्याचे दागिने ठेवल्याचे त्याने पाहिले होते.

वडिलांवरील कर्ज फेडण्यासाठी त्याने मावशीच्या घरी चोरी कारण्याचा प्लॅन केला. त्यानुसार त्याने नवीन कपडे विकत घेतले. ते कपडे घालून त्याने मावशीच्या घरात चोरी करून अडीच लाखांचे दागिने आणि सहा हजार रुपये रोख रक्कम, असा दोन लाख 56 हजारांचा ऐवज चोरला.

त्यानंतर मावशीच्या घरी चोरी झाल्याबाबत त्याने स्वतःहून पोलिसात फिर्याद दिली. आपण फिर्याद दिली असल्याने पोलीस आपल्याला संशयाच्या जाळ्यात ओढणार नाहीत, याची त्याला खात्री होती. मात्र, पोलिसांच्या चौफेर तपासाच्या चक्रात तो सापडला.

पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून अडीच लाखांचे दागिने, 50 रुपयांचा स्क्रू ड्रायव्हर जप्त केला आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.