Sangvi Crime : कोरोनाचे रुग्ण असलेल्या रुग्णालयात काम करते म्हणून महिलेला मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरात पाणी नसल्याने पाणी पाहण्यासाठी इमारतीच्या छतावर जात असलेल्या महिलेला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. पीडीत महिला कोरोनाचे रुग्ण असलेल्या एका रुग्णालयात काम करत आहे. कोरोना रुग्णांच्या रुग्णालयात काम करत असल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे.

संतोष कुंभार, गणेश कुंभार, छाया कुंभार, सोनम कुंभार, अश्विनी कुंभार, सुहास कुंभार (सर्व रा. अनंतनगर, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कोविड सेंटरमध्ये काम करत आहेत. 2 मे रोजी त्या कामावरून घरी आल्या. त्यावेळी त्यांच्या घरात पाणी नव्हते. त्यामुळे पाण्याची स्थिती पाहण्यासाठी त्या इमारतीच्या छतावर जाऊ लागल्या. त्यावेळी आरोपी छाया हिने फिर्यादी यांना अडवले. ‘तू वर कशाला चाललीस. तू कोरोना पेशंटच्या दवाखान्यात काम करतेस. तू वर येत जाऊ नकोस’ असे म्हणून फिर्यादी यांना छतावर जाऊ दिले नाही.

अन्य आरोपींनी ‘हिला खाली ढकलून द्या. हिला माज आला आहे. हिचा माज उतरवा’ असे म्हणून फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन केले. फिर्यादी घाबरून त्यांच्या घरात गेल्या. त्यावेळी आरोपी सोनम आणि अश्विनी त्यांना मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर धावून आले.

फिर्यादी यांची मुळे त्यांच्या मोबईल टॅबमध्ये शुटींग काढत असल्याचे पाहून आरोपींनी बेकायदेशीरपणे घरात घुसून टॅब फोडला. आरोपी संतोष याने फिर्यादी यांना काठीने मारहाण केली. आरोपी गणेश याने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.

याप्रकाराबाबत फिर्यादी यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यावर चौकशी करून 26 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.