Sangvi : हॉर्न वाजविल्यावरून डॉक्टरला मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या प्रवेशद्वारावर एक व्यक्ती सुरक्षारक्षकासोबत वाद घालत उभा होता. त्याने त्याची मोटार मध्येच उभी केल्याने मागून येणा-या वाहनांना अडचण होत होती. मागून आलेल्या एका डॉक्टर वाहनचालकाने हॉर्न वाजवला. यावरून सुरक्षारक्षकासोबत वाद घालणा-या व्यक्तीने हॉर्न वाजवणा-या व्यक्तीला मारहाण केली. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी दीडच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

आदित्य पतकराव (वय 34, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनोज मोरया याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी फेज दोनमध्ये सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आरोपी आणि सुरक्षारक्षक यांच्यामध्ये वाद सुरू होता. आरोपीने वाहन प्रवेशद्वारावर लावल्याने इतरांना आतमध्ये जाण्यास अडथळा होत होता. यामुळे पाठीमागून आलेल्या डॉक्टर आदित्य यांनी हॉर्न वाजविला. याचा राग मनात धरून आरोपी मनोज याने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये आदित्य यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.