Sangvi : सांगवीत पूर्ववैमनस्यातून सोळा वर्षाच्या तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणावर गोळीबार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री पवनानगर, जुनी सांगवी येथे घडली.

या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चैतन कदम (पूर्वी रा. जुनी सांगवी. सध्या पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक अल्पवयीन (वय 16, रा. जयमालानगर, जुनी सांगवी) याने याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मित्र पवनानगर कॉर्नर, जुनी सांगवी येथे मोबाईलवर टीक-टॉक व्हिडिओ पाहात होते. त्यावेळी दुचाकीवरून एक आरोपी  आणि कदम हे दोघेजण आले. दुचाकीवर मागे बसलेल्या अल्पवयीन आरोपीने एका याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर गोळीबार केला. मात्र दोन्ही गोळ्यांचा नेम चुकल्याने ‘तो’ थोडक्‍यात बचावला.

अल्पवयीन आरोपी आणि वसीम खान यांच्यात कबुतरबाजीवरून वैमनस्य आहे. त्या दोघांवर सांगवी आणि चतुःशृंगी पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याचे गुन्हे दाखल आहेत. यातील वसीम खान हा फिर्यादी याला भेटण्यासाठी सांगवी येत असे. यामुळे फिर्यादी आणि अल्पवयीन आरोपी यांच्यात वैमनस्य निर्माण झाले. तसेच त्यांच्यात यापूर्वीही किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच पार्श्‍वभूमीवर हा हल्ला झाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. अल्पवयीन आरोपी हा पूर्वी सांगवी परिसरात राहण्यास होता. दोन महिन्यांपूर्वी तो इतर ठिकाणी राहण्यास गेला.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त विनायक ढाकणे, सहायक आयुक्‍त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. याबाबत अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.