Sangvi : बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्र तयार करून त्याद्वारे जागेबाबत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल दिलीप काशिद (वय 34, रा. काशिदवस्ती, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार विनायक किशोर गारवे (रा. विनायक नगर, नवी सांगवी) आणि अरूण श्रीपती पवार (रा. शहीद भगतसिंग चौक, पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यात माजी नगरसेविका सावित्री गारवे यांचा विनायक हा मुलगा आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्‍टोबर 2013 ते 16 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली. आरोपींनी आपआपसांत संगनमत करून पिंपरी चिंचवड महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर केली. पिंपळे गुरव येथील फिर्यादी यांच्या जमिनीची कोणतीही वाटणी झालेली नसताना तसेच फिर्यादी यांच्या कुटूंबियांची परवानगी न घेता स्वतःच्या फायद्यासाठी मिळकत विकसित केली. यामुळे फिर्यादी यांची मिळकत विक्री व विकसित करण्यासाठी अडथळा निर्माण होऊन फिर्यादी यांचे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले.

वारसदार प्रकाश काशिद हे सहहिस्सेदार असून त्यांच्याकडून गारवे व पवार यांनी कोणतेही मालकी हक्‍क न घेतले नाही. वारसदार प्रभाकर काशिद हे मयत असतानाही त्यांच्या नावे मोजणी अर्ज केला. मोजणीचे बनावट कागदपत्रे महापालिकेच्या नगर रचना आणि बांधकाम परवाना विभागात सादर करून बांधकाम परवाना मिळविला. यामुळे शासनाची तसेच फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे अतुल काशिद यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळीग करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.