Sangvi : सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कटावणी, एक्सा ब्लेड कटर, चॉपर, कोयता अशी घातक अवजारे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई काटेपुरम चौक, सांगवी येथे आज (मंगळवारी) पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी मूळचे नेपाळ येथील आहेत.

भीमराज गंगाराम नाथ (वय 34, रा. साईरंग कॉम्प्लेक्स, काटेपुरम चौक, सांगवी. मूळ रा. टीकापूर कैलाली, ज्योतीनगर, जि. टिकापूर, नेपाळ), गिरी ठेबगे सिंग (वय 35, रा. श्री ज्वेलर्स जवळ, काटेपुरम चौक, सांगवी. मूळ रा. शिवडी, चौर पाटी मंगलसेन, नेपाळ), लक्ष्मण भत्ते टमाटा (वय 32), जनक रत्न ढकाल (वय 30, दोघे रा. कल्याण फाटा पनवेल रोड, मुंबई. मूळ रा. कुईने, तातापाने, ता. गुटू, जि. सुरवेत, नेपाळ), रमेश खडक आहुजा (वय 43, रा. रघुनाथ रोड, बांद्रा वेस्ट, मुंबई. मूळ रा. मुसोरिया, जि. गोटी कैलालीया अंशन, नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेपुरम चौक, सांगवी येथे श्री ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. पाचजण या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. हे सर्वजण नर्मदा गार्डन लॉन्स जवळ असलेल्या दावल भंगार सेंटरच्या मागच्या बाजूला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पहाटे सव्वातीन वाजता त्या ठिकाणी सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी कटावण्या, सॅकबॅग, एक्सा ब्लेड कटर, नायलॉन दोरी, स्टीलचा चॉपर, लोखंडी कोयता, कापडी मास्क, कानटोपी असा 1430 रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सर्वजण श्री ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. यावरून पाच जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.