Sangvi : तथाकथित भाईचा केशकर्तनालयात राडा; दोघांवर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज – तथाकथित भाई आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून केशकर्तनालयात जाऊन राडा केला. केशकर्तनालयात केस कापत असलेल्या तरुणासह त्याच्या एका मित्रावर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी जुनी सांगवी येथे घडली.

मोईन आझादअली खान (वय 18, रा. खडकी लाइन, खडकी बाजार, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन लोहकरे (रा. जुनी सांगवी) आणि त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोईन आणि त्याचा मित्र मुनीर इस्माईल शेख हे दोघेजण शिंदेनगर, जुनी सांगवी येथील केशकर्तनालयात केस कापत होते. त्यावेळी त्यांचा ओळखीचा आरोपी लोहकरे हा तिथे आला. तो मोईन यास ‘तुझे नाव काय, तू कुठे राहतो’, अशी विचारणा करू लागला. त्यावर मुनीर याने काय झाले, अशी विचारणा लोहकरे याला केली.

या कारणावरून चिडलेल्या लोहकरे याने ‘तुला माहिती नाही का, मी इथला भाई आहे, असे म्हणत शिवीगाळ करीत दुकानातील वापरलेले सिंगल पात्याचे ब्लेडने मुनीर शेख याच्या मानेवर आणि फिर्यादी मोईन याच्या तळहातावर वार करून जखमी केले. तसेच त्याठिकाणी असलेल्या राज धैर्यसिंग सूर्यवंशी यांच्याही अंगावर धावून जात शिवीगाळ करीत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.