Sangvi : कामावरून उशिरा येत असल्याच्या कारणावरून पत्नीचा खून; पतीला अटक

एमपीसी न्यूज – पत्नीला दररोज कामावरून येण्यासाठी उशीर होत असल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा कोयत्याने वार करत खून केला. ही घटना आज, सोमवारी (दि. 23) पहाटे सव्वा चारच्या सुमारास वैदूवस्ती सांगवी येथे घडली.

शैला लोखंडे (वय 45, रा. वैदूवस्ती) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती हनुमंत लोखंडे (वय 59) याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत याची पूर्वी दोन लग्न झाली आहेत. पहिल्या पत्नीचे निधन झाले असून दुसरी पत्नी सोडून गेली आहे. त्यामुळे मागील पंधरा वर्षांपूर्वी आरोपी हनुमंत याने शैला यांच्याशी तिसरा विवाह केला होता. हनुमंत आणि शैला यांना मुलबाळ नव्हते. शैला परिसरातील घरांमध्ये धुणी-भांड्याचे काम करीत होत्या.

शैला कामासाठी सकाळी लवकर जात होत्या. तर त्यांना परत येण्यासाठी रात्री उशीर होत असे. धुणीभांडी करण्याच्या कामासाठी एवढा वेळ लागत असल्याने आरोपी हनुमंत आणि शैला यांच्यामध्ये वारंवार वाद होत असे. आज पहाटे हनुमंत याने लोखंडी कोयत्याने शैला यांच्यावर वार करत त्यांचा खून केला. पोलिसांना माहिती मिळाली असता सांगवी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आरोपी पती हनुमंत हा घटनास्थळी होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.