Sangvi : चिंचवड, सांगवीमध्ये घरफोडी करून पावणे सहा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – चिंचवड आणि सांगवीमध्ये घराच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून चोरी केली आहे. दोन घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी पावणेसहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. याबाबत सोमवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात अमित पांडुरंग दांडेकर (वय 39, रा. गावडे पार्क, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दांडेकर यांचे घर 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते 1 जानेवारी दुपारी पावणेतीन या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातून 3 लाख 78 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 2 हजार 500 रुपये रोकड असा एकूण 3 लाख 80 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरी झाल्याने मालाची खात्री करून त्यांनी सोमवारी फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणात सुहास दत्तात्रय पाटील (वय 30, रा. आनंदसागर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील शनिवारी (दि. 4) सकाळी सातारा येथे गेले होते. ते सोमवारी सकाळी सातारा येथून परत आले असता त्यांना त्यांच्या घराचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात बघितले असता त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.