Sangvi : विद्यार्थ्यांनी घेतला खेलो इंडिया क्रीडा महोत्सवाचा आनंद

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांचा अनुभव घेता यावा आणि खेळाडूंबरोबर संवाद साधता यावा, या उद्देशाने सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी बालेवाडी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया महोत्सवाला भेट दिली. यावेळी क्रीडा शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत होते.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे म्हाळुंगे बालेवाडीतील क्रीडानगरीत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याविषयी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या क्रीडा महोत्सवाला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी खो खो आणि कबड्डी या सामन्यांचा थरार अनुभवला.

खेळाडूंना प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांनी या सामन्यांचा अनुभव घेतला. ऍथलेटिक्‍स स्टेडियममागे उभारण्यात आलेल्या क्रीडा प्रदर्शनासही विद्यार्थ्यांनी भेट दिली. तेथे टेबल टेनिस, टेनिस, ऍथलेटिक्‍स, फुटबॉल आदी खेळांची कृत्रिम छोटी मैदाने उभारण्यात आली आहेत. त्याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. ऍथलेटिक्‍सच्या ट्रॅकवर धाव घेण्याचा आनंदही घेतला. तसेच दर्शना देवकर आणि अवंतिका डोंगरे या विद्यार्थिनींनी नृत्य सादर करीत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांना विविध सामन्यांबाबत अद्ययावत माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या माहिती केंद्रालाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. तसेच स्टेडियमध्ये ठिकठिकाणी सुशीलकुमार, मेरी कोम, सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आदी अनेक ऑलिंपिकपदक विजेत्या भारतीय खेळाडूंची पोस्टर्स उभारण्यात आली आहेत. या पोस्टर्सजवळ उभे राहून छायाचित्रेही विद्यार्थ्यांनी काढली.

शाळेतील मुलामुलींनी क्रीडानगरीस भेट देऊन विविध क्रीडा स्पर्धांचा अनुभव घ्यावा व खेळाडूंबरोबर संवाद साधावेत, हा या पाठीमागे उद्देश होता, असे संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.