Sangvi: माथाडी माफिया, भंगार माफियांमुळे उद्योजक हैराण – अजित पवार

शहरातील कायदा-सुव्यस्थेबाबत व्यक्त केली चिंता; फलकबाजी करुन जनतेच्या डोळ्यात फेकताहेत धूळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव, हिंजवडी या औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी वाढली आहे. नवीन कारखानदारी येत नसतानाच जुने कारखानदार गुंडगिरीमुळे त्रस्त आहेत. माथाडी माफिया आणि भंगार माफियांनी उच्छांद मांडला आहे. उद्योजक, लोकप्रतिनीधी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील कायदा-सुव्यस्थेवर चिंता व्यक्त केली. तसेच सत्ताधारी भाजप अनधिकृत बांधकामे, साडेबारा टक्के, शास्तीकराचा प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत. केवळ फलकबाजी करुन जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सांगवी येथे आज (गुरुवारी) पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होऊन देखील गुन्हेगारी वाढली आहे. असुरक्षित शहर झाले आहे. सत्ताधारी भाजप नगरसेवक देखील सुरक्षित नाहीत. वाढत्या गुंडागिरीमुळे परदेशी कंपन्या शहरात थांबायला तयार नाहीत. औद्योगिक पट्ट्यातील कायदा सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. माथाडीच्या नावाखाली काही संघटना अतिरेक करत आहेत. उद्योग करणे कठिण झाले आहे. भंगार माफिया फोफावले आहेत. भंगाराचा ठेका मिळावा, यासाठी मंत्रालयातून फोन येत आहेत. फोफावलेल्या गुंडागिरीला आळा घाला. त्यामध्ये पक्षीय राजकारण आणू नका, कोणत्याही पक्षाचा असला तरी त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

  • यावेळी पवार म्हणाले, शास्तीकर, प्राधिकरणबाधित शेतक-यांना साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावल्याचे सांगत फलकबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर साडे बारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले. तर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाधित शेतक-यांना इतक्या वर्षांनी परतावा का द्यायचा? लाभार्थी कोण आहेत? कोणाला लाभ होईल असा? सवाल केला. मुख्यमंत्री एक बोलतात तर पालकमंत्री दुसरे बोलतात आणि स्थानिक आमदार प्रश्न सुटल्याचे सांगत फलकबाजी करतात. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. शास्तीकराच्या नोटीसा आल्यावर जनतेला शास्तीकर माफ झाला नसल्याचे कळते. शास्तीकराचा प्रश्न राज्य सरकारशी निगडीत असताना महापालिका आयुक्तांना भेटून जनतेसोबत असल्याचे दाखविण्याची नौटंकी केली जाते.

शहरातील रेडझोनचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी नागरिकांना बरे वाटावे यासाठी रेडझोनचा प्रश्न सोडवू असे राजकीय पक्षांकडून सांगितले जाते. मात्र, प्रश्न जैसे थेच असतो. त्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी प्रश्न मार्गी लावतो असे सांगणे बंद करावे. हा प्रश्न फक्त केंद्र सरकार सोडवू शकते. त्यासाठी तिथे प्रयत्न करावेत. रेडझोनच्या हद्दीला सीमाभिंत बांधावी आणि त्या भिंतीच्या पुढे बांधकाम केल्यास मूलभूत सुविधा मिळणार नसल्याचे नागरिकांना सांगावे, असेही पवार म्हणाले.

  • चाकणची तणावपूर्ण परिस्थितीती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली!
    चाकणमध्ये तणावपूर्ण परिस्थितीती निर्माण झाली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या तणावपुर्ण परिस्थितीकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. चाकणमधील परिस्थितीची कल्पना गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे, पवार यांनी सांगितले.

मराठा आंदोलनानंतर गेल्या वर्षी चाकणमध्ये हिंसाचार झाला होता. दंगलीचे सूत्रधार म्हणून कलम 120 ‘ब’ नुसार गंभीर आरोपाखाली राष्ट्रवादीचे माजी आमदार आमदार दिलीप मोहीते यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, कारण नसताना मोहित यांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावर अन्याय करु नका. अन्याय होऊ देऊ नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.