Sangvi : दक्ष नागरिक आणि पोलिसांमुळे चार वर्षांची चिमुकली विसावली वडिलांच्या कुशीत

एमपीसी न्यूज – रस्त्यावर रडत असलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला एका दक्ष नागरिकाने सांगवी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तात्काळ मुलीच्या पालकांचा ठावठिकाणा शोधून काढला आणि मुलीच्या वडिलांना पोलीस ठाण्यात आणले. वडिलांना पाहून मुलगी त्यांच्याकडे झेपावली. काही तासात हरवलेली चिमुकली आपल्या वडिलांच्या कुशीत विसावली. हा प्रकार बुधवारी (दि. 2) सांगवी परिसरात घडला.

बुधवारी उस्मान काशीद सय्यद (रा. पिपंळे गुरव, पुणे) यांना वैदुवस्ती पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाजवळ एक चार वर्षाची मुलगी रस्त्याने रडत चालली असल्याचे दिसले. यामुळे त्यांनी मुलीकडे विचारपूस केली. मात्र ती रडत असल्याने काहीच सांगू शकत नव्हती. उस्मान यांनी आसपासच्या दुकानदारांकडे मुलीबाबत विचारणा केली असता त्यांनाही त्या मुलीबाबत काही सांगता आले नाही. अखेर ते मुलीला घेऊन सांगवी पोलीस ठाण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक एस. एस. राठोड यांना उस्मान यांनी मुलीबाबतची हकीगत सांगितली. त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांच्या कानावर घातली. वरिष्ठांच्या आदेशानुसार वैदुवस्ती, पिंपळे गुरव भागात मुलीच्या पालकांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. अखेर त्या मुलीचे पालक शोधण्यात पोलिसांना यश आले.

भगत बहादुर सोनार यांची कविता नावाची ही मुलगी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस भगत सोनार यांच्या घरी गेले. त्यांना सांगवी पोलीस ठाण्यात आणले. वडिलांना पाहताच मुलीने त्यांच्याकडे झेप घेतली आणि वडिलांच्या कुशीत विसावली. कविता हिची आई बाळंतीण झाल्यामुळे ती ससुन हॉस्पिटल येथे दाखल आहे. त्यामुळे वडिल भगत हे देखील ससून रूग्णालयात गेले होते. जाताना मुलगी कविताला शेजारी राहणाऱ्यांकडे ठेवले होते. मात्र कविता खेळत खेळत रस्त्यावर गेली. त्यानंतर तिला घरचा रस्ता सापडला नसल्याने ती चुकल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.

उस्मान फारीद सय्यद यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मुलगी आपल्या वडिलांच्या कुशीत विसावली. सांगवी पोलिसांनी सय्यद यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला. तर भगत सोनार यांनी सय्यद आणि सांगवी पोलिसांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.