BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : पुण्यात चोरलेला मोबाईल दिला मुंबईच्या भावाला भेट

चोरलेल्या मोबाईलचा तांत्रिक तपास करत सांगवी पोलिसांनी केली दोन सराईतांना अटक

एमपीसी न्यूज – हडपसर, वानवडी, कोंढवा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. मोक्काच्या गुन्ह्यात जमीन मिळाल्यानंतर सराईत आरोपी मित्रासोबत मिळून पुन्हा शस्त्राचा धाक दाखवून एकाला लुटले. त्यात चोरलेला मोबाईल मुंबईच्या भावाला भेट म्हणून दिला. मात्र, चोरलेल्या मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने तपास करत पोलीस मोबाईल वापरणा-या भावापर्यंत पोहोचले आणि गुन्हा करणा-या दोघांना सांगवी पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या.

शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख (वय 24, रा. हडपसर, पुणे), विशाल नानासाहेब आव्हाड (वय 19, रा. हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. शाहरुख याच्यावर हडपसर, वानवडी, कोंढवा पोलीस ठाण्यात 18 ते 20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वानवडी पोलिसांनी दंगल आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली. त्यामध्ये त्याला जमीन मिळाला होता. त्यानंतर त्याने सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा गुन्हा केला. त्याचा मित्र विशाल आव्हाड याच्यावर हडपसर, वानवडी, स्वारगेट पोलीस ठाण्यात 8 ते 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तो फरार आरोपी होता.

  • 30 मे रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास एक तरुण जगताप डेअरी चौकाकडून औंधकडे जात होता. तो वाकड वाय जंक्शन येथे पाणी पिण्यासाठी थांबला असता दोनजण दुचाकीवरून आले. त्यांनी तरुणाला लोखंडी सत्तूरचा धाक दाखवला आणि त्याद्वारे तरुणाच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, रोकड आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून घेऊन गेले.

त्यानंतर तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस या गुन्ह्याचा तांत्रिक बाजूने तपास करत होते. त्यावेळी फिर्यादी तरुणाचा चोरीला गेलेला मोबाईल बदलापूर येथे एक व्यक्ती वापरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सांगवी पोलिसांनी बदलापूर गाठले आणि मोबाईल वापरणा-या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला तो वापरत असलेला मोबाईल त्याच्या हडपसर येथे राहणा-या चुलत भावाने (शाहरुख) दिला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याचा पत्ता काढून हडपसर मधील सय्यद नगर परिसरात सापळा रचून शाहरुख याला ताब्यात घेतले.

  • शाहरुखकडे कसूच चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र विशाल आव्हाड याच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले. पोलिसांनी विशाल याला देखील अटक केली. दोघांकडून पोलिसांनी 60 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 30 हजार रुपये किमतीची एक मोपेड दुचाकी, 6 हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि 200 रुपयांचा एक लोखंडी सत्तूर असा एकूण 96 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी कैलास केंगले, सुरेश भोजणे, चंद्रकांत भिसे, नितीन दांगडे, रोहिदास बो-हाडे, सोमनाथ असवले, शशिकांत देवकांत, अरुण नरळे, विनायक देवकर, दीपक पिसे, नितीन खोपकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, अनिल देवकर यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3