Sangvi : विजेच्या धक्क्याने महावितरणच्या कर्मचा-याचा मृत्यू

ही घटना मंगळवारी (दि. 11) दुपारी बाराच्या सुमारास नवी सांगवी येथील फेमस चौक येथे घडली. : MSEDCL employee dies due to electric shock

एमपीसी न्यूज – विद्युत रोहित्राच्या दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचा-याला विजेचा धक्का बसला. यात हात व कमरेसह शरीराचा अर्धा भाग जळाल्याने कर्मचा-याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 11) दुपारी बाराच्या सुमारास नवी सांगवी येथील फेमस चौक येथे घडली.

हनुमंत नागनाथ भिसे (वय 32, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव. मूळ रा. गोढाळा, ता. रेणापूर, जि. लातूर) असे मृत्यू झालेल्या कर्मचा-याचे नाव आहे. भिसे यांच्या मागे पत्नी, दोन मुले असून, त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांची बहीण देखील राहात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी सांगवी येथील फेमस चौक येथील शनि मंदिराजवळ असलेल्या नरसिंह रेसिडेंसी या सोसायटीच्या लगत विद्युत रोहीत्र आहे. या रोहित्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता.

याबाबत स्थानिक नागरिकांनी महावितरण कंपनीच्या जुनी सांगवी येथील शाखा कार्यालयाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार जुनी सांगवी कार्यालयातील चार ते पाच कर्मचारी एका वाहनातून फेमस चौक येथे दाखल झाले. त्यावेळी लाइनमन हनुमंत भिसे आणि अन्य एक कर्मचारी रोहित्रातील बिघाडाची पाहणी करण्यासाठी वाहनातून खाली उतरले.

_MPC_DIR_MPU_II

रोहित्र उंचावर असल्याने लाइनमन भिसे वर चढले तर दुसरा कर्मचारी खाली थांबला. त्यावेळी भिसे यांना विजेचा धक्का बसून ते खाली पडले.

विजेच्या धक्क्याने भिसे यांचा एक हात तसेच कमरेला भाजले. शरीराचा अर्धा भाग जळाल्याने ते गंभीर जखमी झाले.

त्यामुळे इतर कर्मचा-यांनी त्यांना सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

दरम्यान, इतर कर्मचा-यांनी या घटनेबाबत जुनी सांगवी येथील महावितरणच्या शाखा कार्यालयाचे उपअभियंता रत्नीदीप काळे यांना माहिती दिली. त्यानंतर उपअभियंता काळे यांनी सांगवी पोलिसांना माहिती दिली.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like