Sangvi Msedcl News : सांगवी परिसरात वर्षभरात 405 ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या

महावितरणला आर्थिक भुर्दंड, वीजग्राहकांना मनस्ताप

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरात जेसीबी व इतर यंत्राद्वारे सुरु असलेल्या विविध ठिकाणच्या खोदकामात गेल्या वर्षभरात महावितरणच्या भूमिगत उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या तब्बल 405 ठिकाणी तोडण्यात आल्या. त्यामुळे वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. यात महावितरणला लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीसह वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गंभीर बाब म्हणजे 26 मार्च रोजी महावितरणची उच्चदाबाची भूमिगत वीजवाहिनी खोदकामात तोडल्यामुळे महापारेषणच्या रहाटणी 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील 50 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे सांगवी उपविभागातील 1 लाख 90 हजार वीजग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या सर्वच सातही वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला होता. हे अजस्त्र रोहित्र बदलण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागला.

या कालावधीत महावितरणने युद्धपातळीवर पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठ्याची सोय केली. मात्र भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने काही भागात चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागले होते.

_MPC_DIR_MPU_II

सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सांगवीमधील पीडब्लूडी ग्राऊंडवर कोविड रुग्णालय लवकरच उभारले जाणार आहे. मात्र खोदकामात वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार सुरु राहिल्यास या रुग्णालयासह सांगवीमधील इतर रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

पिंपरी विभाग अंतर्गत सांगवी उपविभागात वाकड, ताथवडे, जुनी व नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, विशालनगर, थेरगावचा काही परिसराला वीजपुरवठा केला जातो. मागील वर्षी 1 एप्रिलपासून आतापर्यंत या परिसरात महावितरणच्या उच्चदाबाच्या 74 आणि लघुदाबाच्या 331 भूमिगत वीजवाहिन्या खोदकामामध्ये तोडण्यात आल्या. या भागात रस्त्याचे रुंदीकरण, पाण्याचे व ड्रेनेजचे पाईपलाईन्स, खासगी कंपन्यांचे केबल्स टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे.

महावितरणला कोणतीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरु आहे. त्यामुळे वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार वाढले आहे. रात्री -बेरात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. कधीकधी वीजपुरवठ्यामुळे पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ न शकल्यास दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित राहत आहे.

यामुळे महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच वाहिनी दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागत आहे. सोबतच ग्राहकांनाही खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. एकाच ठिकाणी दोन ते तीन वेळा भूमिगत वाहिनी तोडली जात असल्याचेही प्रकार दिसून आले आहेत. महावितरणला खोदकामाबाबत पूर्वमाहिती मिळाल्यास वीजवाहिन्यांचा धोका होणार नाही याची काळजी महावितरणकडून घेण्यात येऊ शकते. आतापर्यंत एकूण सात प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.