Sangvi crime News : पत्नीच्या प्रियकराचा खून; पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना मावळात अटक

एमपीसी न्यूज – विवाहापूर्वी असलेल्या तथाकथित प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका तरुणाने पत्नीच्या संशयित प्रियकरचा भर दिवसा खून केला. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी औंध हॉस्पिटल कॅम्पच्या आवारात घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी वडगाव मावळ मधून अटक केली. हे आरोपी दूर पळून जाण्याचा तयारीत होते.

आयाज नुरमोहम्मद शेख (वय 25, रा गल्ली नंबर 8 पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे), नयन उर्फ तांड्या विजय लोंढे (वय 19, रा- लोंढे वस्ती, शिवाजी पुतळयाच्या जवळ, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सोन्या बाराथे आणि अन्य तिघेजण अद्याप फरार आहेत.

सौरभ व्यंकट जाधव (वय 28, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत सौरभ याचा भाऊ सुशांत व्यंकट जाधव (वय 24) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी आयाज याच्या पत्नीचे विवाहापूर्वी मयत तरुण सौरभ याच्यासोबत प्रेम संबंध असल्याचा आयाज याला संशय होता. त्यानंतर आयाजचा त्या तरुणीसोबत विवाह झाला.

मात्र, विवाहापूर्वी असलेल्या प्रेम संबंधाचा राग आयाज याच्या मनात होता. त्या रागातून आयाज याने त्याच्या पाच मित्रांसोबत मिळून सौरभ याला औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नेऊन कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून खून केला.

खून केल्यानंतर आरोपी आयाज आणि तांड्या वडगाव मावळ येथील एका मित्राच्या घरी लपून बसले होते. तिथून ते दूर कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत होते. गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी दोघांना वडगाव मावळ मधून ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या अन्य 4 साथीदारांसोबत मिळून हा खून केल्याचे कबूल केले.

दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.