Sangvi: सांगवी खून प्रकरण; आरोपींच्या नाव साधर्म्यामुळे सोशल मीडियावर अनेकांचा झाला ‘लखोबा लोखंडे’

sangvi murder case; The names of the accused are similar, many people are trolled on social media 'नावात काय आहे' असे म्हणणाऱ्या शेक्सपिअरच्या जगप्रसिद्ध वाक्यात बदल करून 'नावातच सर्वकाही आहे' असं म्हणायचं का, असंही यानिमित्ताने गंमतीने म्हटले जात आहे.

एमपीसी न्यूज- सांगवी खून प्रकरणातील आरोपींच्या नावाशी साधर्म्य असलेल्या अनेकांवर शिव्यांचा भडीमार होत आहे. तसेच नेटकरी त्यांची सोशल मीडियावर चांगलीच नाचक्की करीत आहेत. याचा सांगवी परिसरातील अनेकांना नाहक त्रास होत आहे. केवळ नावात साधर्म्य असल्याने अनेकांचा ‘लखोबा लोखंडे’ झाला आहे. हे नागरिक देखील केवळ ‘तो मी नव्हेच’ असे सगळ्यांना सांगत आहेत. ‘नावात काय आहे’ असे म्हणणाऱ्या शेक्सपिअरच्या जगप्रसिद्ध वाक्यात बदल करून ‘नावातच सर्वकाही आहे’ असं म्हणायचं का, असंही यानिमित्ताने गंमतीने म्हटले जात आहे.

दि. 7 जून रोजी एका तरुणाचा पिंपळे सौदागरमध्ये खून झाला. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटकही केली. हा प्रकार ‘ऑनर किलिंग’चा असल्याने हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले.

सोशल मीडियावरून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यातच सोशल मीडियावरून आरोपींचे फोटो मिळवून त्यांच्यावर शिव्यांचा भडीमार देखील सुरु झाला.

पण या सगळ्या प्रकरणात नाव साधर्म्य असणा-यांना मोठा फटका बसला आहे. आरोपींच्या नावाशी केवळ साधर्म्य असणा-यांचे सोशल मीडियावरून फोटो मिळवून त्याद्वारे त्यांची बदनामी केली जात आहे.

पिंपळे सौदागर परिसरात हेमंत काटे नावाचे पाच जण आहेत. सागर काटे नावाचे दहा, कैलास काटे नावाचे सहा तर जगदीश काटे नावाचे चारजण आहेत. याशिवाय अल्पवयीन आरोपींच्या नावाचेही अनेकजण आहेत.

खून प्रकरणातील आरोपी म्हणून आपला फोटो सोशल मीडियावर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर आपल्या नातेवाईकांचे फोटो पाहून नातेवाईक आता नाव साधर्म्य असणा-यांना फोन करून विचारणा करीत आहेत. मात्र, नाव साधर्म्य असणा-यांकडून केवळ ‘तो मी नव्हेच’ एवढेच सांगितले जात आहे.

या खून प्रकरणाशी संबंधित असलेल्या तरुणीच्या नावाच्याही तीन तरुणी पिंपळे सौदागरमध्ये आहेत. त्या तरुणींकडे देखील परिसरातील नागरिक व नेटकरी संशयाने पाहत आहेत.

एका तरुणाचा नुकताच साखरपुडा झाला. त्याने साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. त्याचे नाव खून प्रकरणातील आरोपीच्या नावाशी जुळते आहे.

एका नेटक-याने साखरपुडा झालेल्या तरुणाचा फोटो डाऊनलोड केला. त्या फोटोखाली या आरोपीला फाशी झाली पाहिजे, असे म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली असेही लिहिले आहे. यामुळे नियोजित वधूच्या घरच्यांनी देखील नियोजित वराकडे चौकशी केली आहे. मात्र, त्याने सर्वांना केवळ ‘तो मी नव्हेच’ असे सांगितले आहे.

कोणतीही खातरजमा न करता केवळ नावाशी साधर्म्य असल्याने फोटो मिळवून त्यावरून बदनामी करणे, भावना व्यक्त करणे चुकीचे आहे. याबाबत पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी नागरिकांना अफवा, गैरसमज न पसरविण्याचे आवाहन केले होते.

सोशल मीडियावर चुकीचे मेसेज, फोटो, व्हिडिओ शेअर केल्यास संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता.

तरीही सोशल मीडियावर असे प्रकार सुरु होते. सांगवी पोलिसांनी याबाबत तब्बल 18 जणांवर गुन्हाही नोंदवला आहे. त्यातील एका तरुणीला मुंबईमधून अटक करण्यात आली आहे.

यापुढील काळात देखील अफवा, गैरसमज, चिथावणीखोर संदेश, आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज, व्हिडिओ टाकणा-यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.