Sangvi News: पार्किंगच्या कारणावरून एकाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पार्किंगच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी आणि मुलीला देखील मारहाण केली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) सकाळी साडेअकरा वाजता लक्ष्मी नगर, पिंपळे गुरव येथे घडली.

रामदास नारायण कडलग (वय 62, रा. लक्ष्मी नगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल गिरीश हळदे (वय 36), लोकेश गिरीश हळदे (वय 35), गिरीश नामदेव हळदे (वय 60, सर्व रा. लक्ष्मी नगर, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. फिर्यादी रामदास आरोपी विशाल याला समजावून सांगत​ ​असताना त्याने रामदास यांची कॉलर पकडून खाली पाडून दगडाने मारहाण करत जखमी केले. त्यानंतर आरोपी लोकश आणि गिरीश यांनी देखील लाथाबुक्क्यांनी रामदास यांना मारहाण केली.

ही भांडणे सोडविण्यासाठी रामदास यांची पत्नी आणि मुलगी या दोघी आल्या. आरोपींनी त्या दोघींना देखील हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. यामध्ये रामदास यांच्या पत्नीचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाले. तसेच रामदास यांच्या मुलीच्या कानातील रिंग पडून गहाळ झाली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.