Sangvi News: हॉटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे किचनमध्ये गॅसचा स्फोट; आचारी जखमी

एमपीसी न्यूज – हॉटेलच्या किचनमधील गॅसच्या शेगडीचा पाईप खराब असल्याचे वारंवार निदर्शनास आणून देऊन सुद्धा हॉटेल मालकाने त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे गॅसचा पाईप निसटून भडका झाला. त्यामध्ये किचन मध्ये काम करत असलेला आचारी गंभीररित्या जखमी झाला. ही घटना 7 ऑगस्ट रोजी घडली असून याबाबत 28 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अभिजित चंदू फुले (वय 34, रा. काळेवाडी फाटा, पुणे) असे जखमी आचा-याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमरसिंह अहुजा आणि सुखवीर अहुजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजित फुले हे आरोपी यांच्या विशाल नगर येथील मदर्स किचन या हॉटेलमध्ये आचारी (स्वयंपाकी) म्हणून काम करतात. हॉटेलच्या किचनमधील गॅस शेगडीचा पाईप खराब असल्याने तो वारंवार निघत होता. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता होती. ही बाब फुले यांनी वारंवार हॉटेलच्या मालकांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, हॉटेलचे आरोपी मालक यांनी त्याकडे दुर्लक्ष करून पाईप दुरुस्त करण्यासाठी टाळाटाळ केली.

7 ऑगस्ट रोजी हॉटेलमध्ये काम करत असताना अचानक गॅसचा पाईप निघाला आणि समोरच्या शेगडीवर जाऊन आदळल्याने भडका झाला. त्यामध्ये फुले यांच्या हाताला, कमरेला भाजल्याने गंभीर दुखापत झाली. उपचारानंतर फुले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.