Sangvi : तलवार आणि कोयत्याने वार करत तरुणावर जीवघेणा हल्ला

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरासमोरील घटना

एमपीसी न्यूज – डायनासोर गार्डन चौकात एका तरुणावर तलवार आणि कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री आठच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घराजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रेवणसिद्ध इरण्णा माडगूळ (वय 21, रा. वरूण हॉटेल समोर, कासारवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी माडगूळ यांचा मित्र वैभव याच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यामुळे वैभव याने माडगूळ यांना पिंपळे गुरव मधील मल्हार सोसायटी येथे बोलावले. त्यानुसार माडगूळ मल्हार सोसायटी येथे त्यांच्या मोपेड दुचाकीवरून जात होते. ते पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनसमोर आले असता अज्ञात आरोपींनी त्यांची पल्सर दुचाकी आडवी लावली. पल्सरवर मागे बसलेल्या एकाने कोयत्याने माडगूळ यांच्या डोक्यात वार केला. तसेच आणखी एका ऍक्टिवावरून आलेल्या दोघांनी तलवारीने माडगूळ यांच्या डोक्यात आणि हातावर सपासप वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माडगूळ गंभीर जखमी झाले. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.