Sangvi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झालेल्या इसमाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची 2 लाख 86 हजार 910 रुपयांची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक केली. ही घटना मार्च ते जून 2018 या कालावधीत घडली.

माधवी जयपाल स्वामी (वय 30, रा. विल्यमनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधवी यांनी लग्नासाठी एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली. त्याद्वारे आरोपीने त्यांच्याशी ओळख केली. माधवी यांचा विश्वास संपादन करून आरोपीने ‘मी विदेशातून लवकरच पुण्यात येणार आहे. कागदपत्रे, लॅपटॉप आणि पैसे असे सामान एक्सप्रेस डिप्लोमॅटिक या कुरिअर द्वारे पाठवले आहे. या कुरिअरमध्ये पैसे असल्याने कस्टम अधिका-यांनी कुरिअर अडविले आहे.

ते सोडविण्यासाठी उशीर झाल्याने लेट फी आणि टर्की देशातून भारतात येण्यासाठी पासपोर्टकरिता अशा विविध कारणांसाठी आरोपीने माधवी यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून 2 लाख 86 हजार 910 रुपये घेतले. त्यानंतर माधवी यांनी आरोपीशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही. यावरून माधवी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.